खेड : तालुक्यातील 11 महसु मंडळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणि त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यात शनिवार दि. १७ सप्टेंबर ते शनिवार दि. १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबवले जाणार आहे.
त्यानुसार रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार खेड तालुक्यातील ११ महसूल मंडळांमध्ये विमुक्त व भटक्या जाती-जमातींसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये नागरिकांना/ ग्रामस्थांना महसूल विषयक लाभ, शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे दाखले, जातीचे दाखले, नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र, आधारकार्ड, शिधापत्रिका वाटप आणि सातबारा विषयक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
खेड तालुक्यात सोमवार दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विविध ठिकाणी ही विशेष शिबिरे पार पडणार आहेत. खेड शहरात एल. पी. इंग्लिश स्कूलच्या प्राथमिक विभागात शिबीर होणार असून, तेथे सेतू सुविधा केंद्र आणि महा ई-सेवा केंद्र चालक सौरभ बुटाला कामकाज पाहतील., चिंचघर मंडळातील शिबीर दस्तुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आले असून तेथे नंदिनी खांबे आणि दुर्वास बेंडखळे सेवा देतील., भरणे गावातील ग्रामपंचायत कार्यालय सभागृहात अरुण काकडे, अमितकुमार उपाणेकर आणि समृद्धी वनारकर उपस्थित राहतील., तळे आणि आंबवली या गावांसाठी सुकिवली येथील राधाकृष्ण हॉलमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, तिथे समीर साबळे, दिनेश शिर्के आणि रूपेश चोचे हे कामकाज पाहतील., लवेल आणि धामणदिवी या गावांसाठी घाणेखुंट येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिबीर पार पडेल, तिथे अमर शेलार आणि तुषार दिवेकर हे सेवा देतील., भोस्ते मंडळासाठी भोस्ते ग्रामपंचायत कार्यालयात सुमित पेटकर कामकाज पाहतील. धामणंद मंडळासाठी धामणंद येथील ग्राम महसूल अधिकारी कार्यालयात किरण तायडे आणि विक्रम सणघर उपस्थित राहतील., कुळवंडी मंडळातील शिबीर कुळवंडी येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये पार पडेल, तिथे संतोष कालप आणि समीर सकपाळ सेवा देतील., शिर्शी मंडळासाठी सवणस खुर्द येथील ग्रामपंचायत कार्यालयात त्रिशा धुलप, ओंकार भोसले, मंदार आपटे, संदेश साळुंके आणि कपिल तांबे हे केंद्र चालक कामकाज पाहतील. सर्व मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक आणि पोलीस पाटील यांनी या शिबिरांचे नियोजन करावे, आणि गावस्तरावर या अभियानाची व्यापक प्रसिद्धी करावी, अशा स्पष्ट सूचना तहसीलदार श्री. सुधाकर सोनवणे यांनी दिल्या आहेत. संबंधित सर्व महा ई-सेवा आणि आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी आवश्यक संगणक व इतर साहित्यासह आपापल्याला नेमून दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.