चिपळूण : शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय तसेच विविध शेतीपूरक व्यवसायांमध्ये प्रत्यक्ष योगदान देणाऱ्या महिलांना आता ‘महिला शेतकरी’ म्हणून स्वतंत्र अधिकृत ओळख मिळणार आहे. यासाठी कृषी विभागामार्फत गावोगावी जनजागृती, नोंदणी आणि अर्ज भरण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. 2 ऑक्टोबर 2026 रोजी होणाऱ्या ग्रामसभेच्या निमित्ताने पात्र महिला शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करून त्यांना महिला शेतकरी प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपातळीवर सहकार्य करावे, असे आवाहन चिपळूण मंडळ कृषी अधिकारी मनोज गांधी यांनी केले आहे.
संयुक्त राष्ट्र महासभेने 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, 2026 लागू केला आहे. शेतीमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष सहभाग असतानाही अनेक महिलांच्या नावावर जमीन नसल्याने त्यांना कागदोपत्री शेतकरी म्हणून ओळख मिळत नव्हती. त्यामुळे विविध शासकीय योजना, कृषी कर्ज, पीक विमा, अनुदान, कृषी निविष्ठा, प्रशिक्षण आणि तांत्रिक मार्गदर्शनाचा लाभ घेताना अडचणी येत होत्या.
प्रत्यक्ष सहभागाला महत्त्व
नव्या व्यवस्थेत जमिनीच्या मालकीपेक्षा शेती व शेतीपूरक व्यवसायातील प्रत्यक्ष सहभागाला महत्त्व देण्यात येत आहे. पात्र महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर विविध कृषी योजनांशी जोडणी सुलभ होण्यास मदत होणार आहे. या प्रमाणपत्रामुळे पात्रतेनुसार कृषी कर्ज व पतसुविधा, पीक विमा, कृषी विभागाच्या अनुदान योजना, बियाणे व खते यांसह कृषी निविष्ठा, कृषी अवजारे व यांत्रिकीकरण, कृषी विस्तार सेवा, तांत्रिक मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होऊ शकते. तसेच पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, मत्स्यव्यवसाय आणि अन्य शेतीपूरक योजनांशी महिलांना जोडणे सुलभ होणार आहे.
शेतीसह अन्य कृषीपूरक व्यवसायांमध्येही महिला महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मात्र त्यांच्या नावावर जमीन नसल्याने या योगदानाची अधिकृत नोंद अनेकदा होत नव्हती. नव्या उपक्रमामुळे या योगदानाची कागदोपत्री नोंद होण्यास मदत होणार आहे.
गावनिहाय कॅम्पद्वारे नोंदणी
महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी कृषी विभागाने स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल सुरू केले असून, गावनिहाय जनजागृती व अर्ज नोंदणी कॅम्प आयोजित करण्यात येत आहेत. कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी गावोगावी जाऊन पात्र महिलांना याबाबत माहिती देत असून, ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य करीत आहेत.
2 ऑक्टोबरच्या ग्रामसभेच्या माध्यमातून हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य, महिला बचत गट, शेतकरी गट तसेच गावातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करून पात्र महिला शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करावी, अशी अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली आहे. अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रांबाबत अधिक माहितीसाठी कृषी सेवक, सहाय्यक कृषी अधिकारी किंवा ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन मंडळ कृषी अधिकारी, चिपळूण मनोज गांधी यांनी केले आहे.
महिलांना मिळणार आत्ता नवी ओळख ; महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी 2 ऑक्टोबर च्या ग्रामसभेमार्फत जनजागृती
