खेड : लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात कोकण नागरी संघर्ष समिती आणि लोटे पंचक्रोशी पर्यावरण समितीच्या वतीने शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी गांधी जयंतीदिनी खेड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी, खेड यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आली आहे.
आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीत तयार होणाऱ्या ‘पीपास’ या रसायनामुळे मानवी आरोग्य तसेच पर्यावरणाला धोका निर्माण होत असून, चिपळूण व खेड परिसरातील नद्यांचे पाणी प्रदूषित होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रदूषणाचा परिणाम नदीवर आधारित मासेमारी व्यवसायावर अवलंबून असलेल्या कुटुंबांवर होत असल्याचेही समितीने निवेदनात म्हटले आहे. लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात दि. २१ जानेवारी २०२६ पासून कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू असल्याचे आंदोलकांनी नमूद केले आहे. तसेच, महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्र्यांनी विधान परिषदेत कंपनी बंद करण्याचे आश्वासन दिल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. मात्र, अद्याप कंपनी बंद करण्यात आलेली नसल्याने गांधी जयंतीच्या दिवशी खेड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, प्रस्तावित आंदोलनाची माहिती खेड तहसीलदार कार्यालय तसेच खेड पोलीस ठाण्याला देण्यात आली आहे. आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
या आंदोलनात राजेंद्र आंब्रे, अशोकराव जाधव, रवींद्र गोवळकर, उदय घाग, सुबोध सावंत देसाई, शंतूनू रेडीज, बशिर मुजावर, दिलीप घाग, जितेंद्र आंब्रे, भालचंद्र पटवर्धन, सुनील जाधव, संजय जुवळे, सुनील चाळके, मंगेश चाळके, कांचन चाळके, फैसल देसाई यांच्यासह जसनाईक, सुर्वे, जाधव, मांढरे, अंतुले, काद्री आदी सहभागी होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.