खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील उधळे बुद्रुक येथील १५ वर्षीय आर्यन राजेश खेडेकर याने पश्चिम बंगालमधील भागीरथी नदीत आयोजित खुल्या जलतरण स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत खेडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
आर्यनने तब्बल ८१ किलोमीटरचे खडतर अंतर ११ तास ३४ मिनिटांत पूर्ण करत या स्पर्धेत सहभागी झालेल्या जलतरणपटूंमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. विशेष म्हणजे, या स्पर्धेतील सर्वात तरुण जलतरणपटू म्हणून त्याने ही कामगिरी केली असल्याचे सांगण्यात आले. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत प्रदीर्घ अंतर पोहत पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली शारीरिक क्षमता, मानसिक चिकाटी आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर आर्यनने ही कामगिरी साध्य केली. त्याच्या या यशामुळे खेड तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
आर्यनच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नामदार योगेशदादा कदम यांनी त्याचा स्नेहपूर्वक सत्कार करून भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी आर्यनच्या जिद्द, मेहनत आणि धाडसी कामगिरीचे कौतुक करताना, त्याचे हे यश संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी असल्याचे योगेशदादा कदम यांनी सांगितले.
लहान वयातच खडतर खुल्या जलतरण स्पर्धेत एवढ्या प्रदीर्घ अंतराची कामगिरी करणाऱ्या आर्यनच्या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, त्याच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.