चिपळूण : दिवेआगर समुद्रकिनारी आठ मुलांचा बुडून झालेल्या दुर्दैवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवरील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी १८ वर्षांखालील मुलांना जीवरक्षकांच्या सोबतीशिवाय समुद्रकिनारी जाण्यास बंदी घालावी, अशी मागणी नगर बाल संरक्षण समितीच्या अध्यक्षा आणि चिपळूण नगरपरिषदेच्या नगरसेविका अंजली कदम यांनी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोकण पर्यटनासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. मात्र बाहेरून येणाऱ्या अनेक पर्यटकांना समुद्राची खोली, पाण्याची पातळी, समुद्रातील प्रवाह आणि स्थानिक भौगोलिक परिस्थितीची पुरेशी माहिती नसते. त्यामुळे समुद्रात उतरताना पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना घडत असल्याचे कदम यांनी निवेदनात नमूद केले आहे.

लहान मुलांच्या समुद्रकिनारी जाण्यावर विशेष सुरक्षाव्यवस्था लागू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मुलांसोबत पालक, शिक्षक किंवा संबंधित जबाबदार व्यक्ती असणे बंधनकारक करावे. तसेच मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारणाऱ्या व्यक्तीकडून विहित नमुन्यातील सुरक्षा अर्ज भरून घ्यावा, अशी सूचनाही निवेदनातून करण्यात आली आहे.

जीवरक्षकांची नियुक्ती, पालक किंवा शिक्षकांची निगराणी आणि आवश्यक सुरक्षा प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच मुलांना समुद्रकिनारी जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी अंजली कदम यांनी केली आहे.

“कोकणात पर्यटन वाढणे ही सकारात्मक बाब आहे; मात्र त्यासोबत सुरक्षित पर्यटनालाही प्राधान्य मिळणे आवश्यक आहे,” असे मत कदम यांनी व्यक्त केले आहे. दिवेआगरसारख्या दुर्घटना भविष्यात पुन्हा घडू नयेत यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने या मागण्यांचा संवेदनशीलपणे विचार करून योग्य ती कार्यवाही करावी, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.