मंडणगड : मंडणगड तालुक्यातील वलौते येथील राजेश बबन तांबे (वय ४५) यांचा मुंबई येथील केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस स्थानकातुन या संदर्भात
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश तांबे हे भिंगळोली येथील शिगवण ढाबा येथे गेल्या सुमारे चार वर्षांपासून काम करीत होते. १ सप्टेंबर २०२६ रोजी हॉटेलमध्ये काम करीत असताना दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास ते हॉटेलच्या पायऱ्यांवरून पाय घसरून खाली पडले. यावेळी त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाली.
घटनेनंतर हॉटेलचे मालक वल्लभ शिगवण यांनी त्यांना तत्काळ केईएम रुग्णालय, मुंबई येथे उपचारासाठी दाखल केले. तेथे करण्यात आलेल्या सीटी स्कॅनमध्ये त्यांच्या डोक्यामध्ये रक्ताची गाठ झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. २ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ६.२३ वाजता त्यांना केईएम रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. डोक्यातील रक्ताच्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद मंडणगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक १७/२०२६, बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे. मृत राजेश तांबे यांच्या पश्चात कुटुंबीय आहेत.