श्रीवर्धन : हृदयविकाराचा झटका, पाण्यात बुडणे किंवा विजेचा धक्का बसल्यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत एखाद्या व्यक्तीचा जीव कसा वाचवायचा, याचे धडे आता शालेय विद्यार्थ्यांना मिळतात. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या लीलाबाई ठाकर्सी कॉलेज ऑफ नर्सिंग (चर्चगेट-मुंबई) यांच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त कुलगुरू निधी अंतर्गत श्रीवर्धन तालुक्यातील शाळांमध्ये ‘समुदायाभिमुख आरोग्य जनजागृती उपक्रम’ राबवला जात आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना हृदय-फुफ्फुस पुनरुज्जीवन प्रक्रियेचे (CPR) प्रत्यक्ष प्रात्यक्षिक व प्रशिक्षण देण्यात आले.
​कृत्रिम प्रतिकृतीच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना ‘हँड्स ऑन’ सराव करण्यात आला
​या उपक्रमांतर्गत बोर्ली पंचतन येथील श्री मोहनलाल सोनी विद्यालय आणि कापोली येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूलमधील इयत्ता ७ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना सीपीआरचे शास्त्रीय प्रशिक्षण देण्यात आले.
​लीलाबाई ठाकर्सी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. किर्ती मंगेश जामदार यांनी कृत्रिम मानवी प्रतिकृतीच्या (CPR Dummy) साहाय्याने सीपीआर देण्याची अचूक व शास्त्रीय पद्धत विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. केवळ व्याख्यान न देता, विद्यार्थ्यांनी स्वतः प्रतिकृतीवर सीपीआरचा प्रत्यक्ष सराव करून घेतला आणि त्यांच्या शंकांचे निरसन केले.
​हा उपक्रम केवळ एका किंवा दोन शाळांपुरता मर्यादित नसून, श्रीवर्धन तालुक्यातील ४ ते ५ शाळांमध्ये राबवला जाणार आहे.
​माजी कुलगुरू प्रा. डॉ. उज्ज्वला चक्रदेव आणि प्रभारी प्राचार्या डॉ. शोभा गायकवाड यांच्या सहकार्यातून हा उपक्रम साकार होत आहे.
श्रीवर्धन तालुक्याचे शिक्षण अधिकारी श्री. रमेश चव्हाण यांचे या उपक्रमासाठी मोलाचे मार्गदर्शन व प्रशासकीय समन्वय लाभत आहे.
​उपक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल श्री मोहनलाल सोनी विद्यालयाचे प्राचार्य श्री. येळमंते सर व न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूलचे प्राचार्य श्री. मुरकर सर यांचे आयोजकांनी आभार मानले.
​पुस्तकी ज्ञानापलीकडे ‘जीवनरक्षक कौशल्य’
​आपत्कालीन वैद्यकीय मदत (Emergency Medical Help) पोहोचेपर्यंतच्या अत्यंत महत्त्वाच्या वेळात योग्य पद्धतीने दिलेला सीपीआर एखाद्या व्यक्तीला जीवनदान ठरू शकतो. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता, प्रत्यक्ष आयुष्यात उपयोगी पडणारे जीवनरक्षक कौशल्य (Life-saving skill) शिकवून त्यांना संकटसमयी सक्षम करणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.