मंडणगड : नागरिकांचे सक्षमीकरण, शासन-प्रशासनातील पारदर्शकता आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी माहिती अधिकार कायद्याची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. माहिती अधिकार हा केवळ कागदावरील हक्क न राहता सामान्य नागरिकांच्या हातातील प्रभावी हत्यार बनला पाहिजे, असे प्रतिपादन मंडणगड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास केंद्रे यांनी मंडणगड येथे केले. लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि मंडणगड पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक माहिती अधिकार दिनानिमित्त आयोजित मार्गदर्शनपर कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर होते.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विष्णू जायभाये, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. संदीप निर्वाण, मंडणगड पोलीस ठाण्याचे अशोक गायकवाड, विनय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस उपनिरीक्षक रोहिदास केंद्रे म्हणाले की, माहिती अधिकार कायदा २००५ हा सामान्य नागरिकांना शासन आणि प्रशासनाला जबाबदार धरण्याची संधी देणारा प्रभावी कायदा आहे. या कायद्यामुळे शासकीय कामकाजात पारदर्शकता वाढते, भ्रष्टाचाराला आळा घालण्यास मदत होते आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांना लक्ष ठेवता येते. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी माहिती अधिकाराचा प्रभावी वापर होणे आवश्यक आहे. मात्र, या कायद्याचा वापर गैरहेतूने न करता जनहिताच्या आणि विधायक कामांसाठी व्हावा, यासाठी समाजात व्यापक जनजागृती होणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संदीप निर्वाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. विष्णू जायभाये यांनी मानले.
फोटो ओळी : मुंडे महाविद्यालयात आयोजित जागतिक माहिती अधिकार दिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मंडणगड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास केंद्रे. सोबत अन्य मान्यवर.