लांजा : ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ ही वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण केवळ घोषणांपुरती मर्यादित न ठेवता ती प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचा निर्धार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या लांजा तालुक्यातील शिवसैनिकांनी दाखवून दिला आहे. संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई रोखण्यासाठी आणि जलसंधारणाला बळ देण्यासाठी सालपे-केळवली उपविभागात स्थानिक ग्रामस्थ व शिवसैनिकांच्या श्रमदानातून वनराई बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रत्नागिरी (दक्षिण) जिल्हाप्रमुख मा. दत्ताजी कदम यांनी राजापूर, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर आणि चिपळूण या तालुक्यांतील तालुकाप्रमुखांना संभाव्य पाणी व चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहून पूर्वनियोजन करण्याचे निर्देश दिले होते. नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन, पाण्याचा काटकसरीने वापर, जलसंधारणाच्या कामांचे नियोजन आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागातून श्रमदान करण्याचे आवाहनही करण्यात आले होते. या निर्देशांना प्रतिसाद देत लांजा तालुक्यातील सालपे-केळवली येथे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.

सालपे-केळवली उपविभाग प्रमुख श्री. सुभाष शिवराम तावडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक ग्रामस्थ आणि शिवसैनिकांनी एकत्र येत वनराई बंधाऱ्याच्या कामात सहभाग घेतला. या उपक्रमात उमेश तावडे, रमेश साळुंखे, अंकुश खांडेकर, शिवाजी तावडे, अक्षय कदम, अशोक साळुंखे, राजदीप साळुंखे, श्रीमती सुमित्रा तावडे, अनिता तावडे आणि सुंदराबाई तावडे यांच्यासह प्रमुख ग्रामस्थ व शिवसैनिक सहभागी झाले आहेत.

वनराई बंधाऱ्यांसारख्या स्थानिक पातळीवरील जलसंधारणाच्या उपाययोजनांमुळे पावसाचे पाणी अडविणे, त्याचा स्थानिक पातळीवर साठा वाढविणे आणि पाण्याच्या उपलब्धतेला पूरक आधार निर्माण करणे शक्य होते. मात्र, संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अशा कामांसोबत पाण्याचा काटकसरीने वापर, जलस्रोतांचे संवर्धन आणि गावनिहाय नियोजन यांनाही तितकेच महत्त्व आहे.

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या विचारांना कृतीतून अभिवादन!जनतेच्या पाणीप्रश्नासाठी, शेतकरी बांधवांच्या हितासाठी आणि पशुधनाच्या संरक्षणासाठी संकटाची तीव्रता वाढण्यापूर्वीच सज्ज होणे, हीच समाजकारणाची खरी दिशा आहे. लांजा तालुक्यातील हा उपक्रम केवळ एका बंधाऱ्याच्या कामापुरता मर्यादित न राहता, स्थानिक सहभागातून जलसंधारणाची जाणीव दृढ करणारा ठरू शकतो.

कारण शिवसेनेचे समाजकारण केवळ भाषणांतून नव्हे, तर जनतेच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात उतरून केलेल्या कामातून दिसले पाहिजे. संकट येण्याची वाट न पाहता आजच पाण्यासाठी श्रमदान करणे, हीच बाळासाहेबांच्या शिकवणीला कृतीतून दिलेली मानवंदना!