खेड : – शहरातील वाढती लोकसंख्या, बोरज धरणातील मर्यादित पाणीसाठा आणि मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचा प्रश्न यामुळे आगामी उन्हाळ्यात संभाव्य पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर खेड नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने टँकरद्वारे पाणीपुरवठा, सार्वजनिक विहिरी व बोअरवेलची दुरुस्ती, जलवाहिन्यांमधील गळती रोखणे आणि पर्यायी जलस्रोतांचा वापर अशा उपाययोजनांचे नियोजन सुरू केले आहे. या प्रश्नावर चर्चा करून तातडीचे निर्णय घेण्यासाठी पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीचे सभापती तथा उपनगराध्यक्ष सतीश गणपत चिकणे यांनी नगरपरिषदेच्या सभागृहात तातडीची बैठक आयोजित केली होती.
खेड शहराला भरणा जॅकवेल आणि बोरज धरण या दोन प्रमुख स्रोतांमधून पाणीपुरवठा केला जातो. नातूनगर, शिरवली, खोपी आणि शिरगाव (पिंपळवाडी) येथील धरणांमधील पाणी जगबुडी नदीतील भरणा जॅकवेल येथे आणून पंपांच्या सहाय्याने शहराला पुरवले जाते. नातूनगरचा जलस्रोत सध्या कार्यरत आहे. मात्र, बोरज धरणातील पाणीसाठा मर्यादित असल्याने जानेवारी अखेर या स्रोतावरील पाणीपुरवठा बंद होण्याची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे उन्हाळ्यात शहराची पाण्याची गरज भागविण्यासाठी पर्यायी व्यवस्थेचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. बोरज धरण ब्रिटिशकालीन असून, त्याची मुख्य जलवाहिनी जगबुडी नदीपात्रात नादुरुस्त झाली आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे नियोजन सुरू असल्याचे नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने नमूद केले आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर मार्च ते एप्रिलदरम्यान शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे, अमृत २.० योजनेअंतर्गत सहा दशलक्ष लिटर पाणीसाठा आरक्षित असून, नातूनगर ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत गुरुत्ववाहिनीने पाणी आणण्याचे नियोजन आहे. या कामासाठी फेब्रुवारी ते मार्चदरम्यानची कालमर्यादा नमूद करण्यात आली आहे.
संभाव्य पाणीटंचाईच्या काळात नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नगरपरिषदेचा एक आणि भाडेतत्त्वावरील एक असे दोन टँकर सध्या कार्यरत आहेत. गरजेनुसार आणखी चार ते पाच टँकर भाडेतत्त्वावर घेण्याचे नियोजन सुरू आहे. याशिवाय शहरातील नादुरुस्त बोअरवेलची दुरुस्ती, वितरण वाहिन्यांमधील गळती काढणे, सार्वजनिक विहिरींची साफसफाई आणि पाणी उपसण्यासाठी विद्युत पंप बसविण्याची कामे हाती घेण्याचे नियोजन आहे. नगरपरिषदेच्या माहितीनुसार, शहरात १६ सार्वजनिक बोअरवेल आहेत. त्यापैकी बहुतांश ठिकाणी मुबलक पाणी उपलब्ध असल्याची नोंद आहे. मात्र, काही ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी असल्याने संबंधित जलस्रोतांची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करण्याची गरज आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील पंप आणि इतर साहित्याची देखभाल करण्यावरही भर दिला जाणार आहे.
खेड शहरातील गुलमोहर पार्क, महाड नाका, डाक बंगला, क्षेत्रपाल नगर, समर्थ नगरचा काही भाग, कुंभार आळी, साठी मोहल्ला, तांबे मोहल्ला, साळीवाडा, कासार आळी, महाडीक मोहल्ला, डेंनकर मोहल्ला, कौचाली मोहल्ला आणि खोंडा रोड परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचे नगरपरिषदेच्या आराखड्यात नमूद आहे. लोकसंख्यावाढीमुळे काही भागांत ही समस्या निर्माण झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या भागांतील वितरण व्यवस्था सुधारण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. खेड बाजारपेठ, वाणी पेठ, कातळ आळी, हनुमान पेठ, सोनार आळी, ब्राह्मण आळी, पोत्रिक मोहल्ला, समर्थ नगर, संत रोहिदास नगर, सम्राट अशोक नगर, शिवाई नगर, गणेश नगर, जड्याळवाडी, मैत्री नगर, पदुमलेवाडी आणि भुवडवाडी यांसह अनेक भागांत तुलनेने मुबलक पाणीपुरवठा होत असल्याची नोंद आहे.
सन २०११ च्या जनगणनेनुसार खेड शहराची लोकसंख्या १६ हजार ८९२ होती. नगरपरिषदेच्या सन २०२६ च्या अंदाजानुसार शहराची लोकसंख्या २० हजार १९५ झाली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर दररोज सुमारे ३० लाख लिटर पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. शहरात तीन उंचावरील पाण्याच्या टाक्या आणि सात जमिनीवरील साठवण टाक्या आहेत. या टाक्यांची एकत्रित क्षमता तसेच पंपिंग यंत्रणेची कार्यक्षमता पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शहरातील सार्वजनिक व खासगी विहिरींची पाहणी, साफसफाई आणि आवश्यक दुरुस्ती करण्याचे नियोजन आहे. गुजर आळी व कासार आळी परिसरातील विहिरींची पाहणी करण्याबरोबरच विविध जलस्रोतांतील पाण्याची तपासणी केली जाणार आहे. नारंगी नदीवर बंधारा बांधण्याचे नियोजन, इमारतींच्या पाण्याच्या टाक्यांमधील गळती रोखण्यासाठी नोटिसा आणि पाणी बचतीबाबत जनजागृती करण्याचाही प्रस्ताव आहे. पाणीपुरवठा समितीचे सभापती तथा उपनगराध्यक्ष सतीश गणपत चिकणे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत सध्याच्या पाणीटंचाई परिस्थितीचा आढावा, टँकरद्वारे पाणीपुरवठा, विहिरींचे अधिग्रहण आणि स्थानिक पाणीसमस्यांवर चर्चा होणार आहे. प्रत्येक प्रभागातील पाणीपुरवठ्याची स्थिती लक्षात घेऊन तातडीच्या उपाययोजना निश्चित करण्याची गरज आहे.
दरम्यान, बोरज धरणाच्या मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती आणि अमृत २.० योजनेतील कामे नियोजित वेळेत पूर्ण होणे महत्त्वाचे ठरणार आहे. आगामी उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी नगरपरिषद प्रशासनाने नियोजित उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.