खेड : बसस्थानकातील सुलभ शौचालयात पाण्याअभावी गेल्या पंधरा दिवसांपासून अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरल्याचा आरोप करत भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. प्रवाशांना होणारा त्रास आणि स्वच्छतेचा उडालेला बोजवारा याकडे लक्ष वेधण्यासाठी वैभव खेडेकर यांनी टमरेल आंदोलनाचं हत्यार उपसलं. हातात टमरेल, कमरेला टॉवेल आणि प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत काढलेल्या या मोर्चाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
इतकंच नव्हे, तर राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना थेट सुलभ शौचालयात घेऊन जात आंदोलनकर्त्यांनी त्यांना प्रत्यक्ष परिस्थिती दाखवली. स्वच्छतेचं कंत्राट असलेल्या कर्मचाऱ्यांनाही यावेळी जाब विचारण्यात आला. पाण्याची तातडीने व्यवस्था करून शौचालयाची स्वच्छता केली नाही, तर पुढील चार दिवसांत संबंधित अधिकाऱ्यांना त्याच ठिकाणी कोंडून ठेवण्याचा इशारा वैभव खेडेकर यांनी दिला आहे.
पाण्याअभावी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असताना, आता तरी प्रशासन जागं होणार का? की खेड बसस्थानकातील दुर्गंधी दूर करण्यासाठी आणखी एखाद्या आंदोलनाची वाट पाहावी लागणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे.