मार्गताम्हाने : गुहागर-चिपळूण मार्गावर गुहागर- रत्नागिरी एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेला एसटीतू उतरत असताना गंभीर दुखापतीला सामोरे जावे लागले आहे.
एसटी बसमधून खाली उतरलेल्या महिलेच्या पायावरून बसचे चाक गेल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिला गुहागर तालुक्यातील रहिवासी असून, आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी येथील एका रुग्णालयात येत होती. ती सकाळी आठ वाजता गुहागर आगारातून सुटणाऱ्या गुहागर-रत्नागिरी एसटी बसमधून प्रवास करत होती. घोणसरे येथे बसमधून उतरत असताना हा दुर्दैवी अपघात घडला. यावेळी बसचे चाक महिलेच्या पायावरून गेल्याने ती गंभीर जखमी झाली. अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला मदत केली. महिलेची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला स्थानिक नागरिकांच्या मदतीने डेरवण येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे घडला, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
