लांजा: बाजारात सापडलेल्या मंगळसूत्राचा मोह न ठेवता ते पोलिसांच्या स्वाधीन करणाऱ्या वर्षा पडये यांच्या प्रामाणिकपणामुळे एका महिलेला आपले हरवलेले मंगळसूत्र पुन्हा मिळाले असून लांजा पोलिसांनी ओळख पटवून मंगळसूत्र महिलेला परत केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी लांजाच्या आठवडा बाजारात ओजस मेडिकलसमोर वर्षा वसंत पडये (रा.कुर्णे, पडयेवाडी) यांना मंगळसूत्र पडलेले दिसले. त्यांनी तत्काळ परिसरात चौकशी केली, मात्र मंगळसूत्र कोणाचे आहे याचा पत्ता लागला नाही. यानंतर त्या ठिकाणी जवळच असणारे हॉटेल श्रीकृष्णचे मालक बाबा शिंदे यांनी लांजा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगले यांना याची माहिती दिली.

उपनिरीक्षक सरंगले यांनी मंगळसूत्र पडये यांच्याकडून ताब्यात घेऊन ते पोलीस ठाण्यात जमा करून विविध माध्यमांतून त्याची माहिती प्रसारित केली आणि पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन केले. या आवाहनानंतर मंगळसूत्र हरवलेल्या कोचरी गुरववाडी येथील रोहिणी रविंद्र गुरव यांनी गुरुवारी लांजा पोलिसांशी संपर्क साधला. तर शनिवारी पोलीस ठाण्यात रोहिणी गुरव यांनी मंगळसूत्राची ओळख पटविल्यानंतर पोलिसांनी मंगळसूत्र त्यांना परत केले.

दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगले आणि महिला हेड कॉन्स्टेबल रेहाना नावळेकर यांनी रोहिणी गुरव यांना मंगळसूत्र सुपूर्द केल्यानंतर स्वतःचे सौभाग्याचे लेणे परत मिळाल्याने रोहिणी गुरव यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळले आणि तिने पोलिसांचे आभार मानले. तर या घटनेत वर्षा पडये यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.