चिपळूण : चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेले श्री. प्रकाश बेले हे दि. ३१ ऑक्टोबर रोजी प्रदीर्घ पोलीस सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवाकार्याचा गौरव करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
पोलीस खात्यातील जबाबदारी ही केवळ कायदा आणि सुव्यवस्था राखण्यापुरती मर्यादित नसून समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, गुन्हेगारीला आळा घालणे, तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करणे आणि सामान्य नागरिकांच्या अडचणींना संवेदनशीलतेने प्रतिसाद देणे, हीदेखील पोलिसांची महत्त्वाची सामाजिक जबाबदारी आहे. या व्यापक भूमिकेच्या अनुषंगाने प्रकाश बेले यांच्या चिपळूण येथील कार्यकाळाचा यावेळी आढावा घेण्यात आला.
त्यांच्या कार्यकाळात अमली पदार्थांविरोधातील कारवाईसाठी कृती आराखडा तयार करणे, वाहतूक शिस्तीबाबत ठोस भूमिका घेणे, गंभीर गुन्ह्यांच्या तपासात मार्गदर्शन करणे तसेच गणेशोत्सव आणि अन्य सार्वजनिक उत्सव शांततेत पार पडण्यासाठी आवश्यक दक्षता घेणे, अशा विविध बाबींची सार्वजनिक वृत्तमाध्यमांतून दखल घेण्यात आली होती.
विशेषतः चिपळूण परिसरात वाढत्या अमली पदार्थांच्या समस्येबाबत नागरिक आणि सामाजिक संघटनांशी संवाद साधून या समस्येविरोधातील लढ्यात समाजाच्या सहभागाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले होते. तरुण पिढीचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा आणि समाज यांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता असल्याची भूमिका त्यांनी मांडली होती.
यावेळी जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे यांनी प्रकाश बेले यांच्या चिपळूणमधील कार्याचा आढावा घेत त्यांच्या कर्तव्यनिष्ठ सेवेला सलाम केला. पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांतूनच नागरिकांचा कायदा व सुव्यवस्था आणि पोलीस यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ होत असतो, असे नमूद करत त्यांनी बेले यांच्या प्रदीर्घ सेवाकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
“वर्दी उतरली तरी कर्तव्याची ओळख कायम राहते आणि पदाचा कार्यकाळ संपला तरी माणसांच्या मनात निर्माण केलेला विश्वास कायम राहतो,” या शब्दांत सचिन चोरगे यांनी त्यांच्या सेवाकार्याचा गौरव केला.
या सन्मानप्रसंगी चिपळूण शहरप्रमुख सचिन (भैय्या) कदम, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे, युवासेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे, शहर सचिव प्रशांत मुळ्ये आणि युवासेना उपशहर अधिकारी आकाश कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रदीर्घ आणि जबाबदारीच्या पोलीस सेवेनंतर सुरू होणाऱ्या आयुष्याच्या नव्या पर्वात प्रकाश बेले साहेबांना उत्तम आरोग्य, निरामय जीवन, मनःशांती आणि आनंद लाभो. कुटुंबीयांसमवेत त्यांची पुढील वाटचाल सुखकर, समाधानकारक आणि आरोग्यदायी होवो, अशा मनःपूर्वक सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
