दापोलीः- तहसिलदार अर्चना बोंबे यांनी आसूदला भेट देऊन भात शेतीची पाहणी केली. सध्या तालुक्यामध्ये युध्दपातळीवर पीक पाहणी सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. त्या अनुषंगाने बोंबे यांनी ही भेट देत अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना केल्या.
यावेळी त्यांनी पीक पाहणी अधिकाऱ्याकडून पीक पाहणीचा आढावा घेतला. तसेच आसूद गावातील भात शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली असता, अपुऱ्या पावसामुळे भाताचे दाणे भरलेले दिसून आले नाहीत. काही ठिकाणी पावसाअभावी भात शेती करपलेली निदर्शनास आले. अचूक सर्वेक्षण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या पाहणीवेळी मंडळ अधिकारी विनोद सिंग रजपूत, आसूदचे पोलिस पाटील विक्रांत बिवलकर, निकेत बांद्रे, यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.