चोरवणे : गावाचा विकास हा केवळ योजनांमधून होत नसतो, तर त्यासाठी गावकऱ्यांची एकजूट, सामूहिक प्रयत्न आणि गावाबद्दल असलेली आपुलकीही तितकीच महत्त्वाची असते. याच एकजुटीचा आणि श्रमदानाच्या सामर्थ्याचा प्रत्यय चोरवणे गावात पाहायला मिळाला.
ग्रामपंचायत चोरवणे-निवे आणि ग्रामस्थ चोरवणे, तसेच नाम फाऊंडेशन आणि अनुलोम या संस्थांच्या विशेष सहकार्यातून चोरवणे गावात टेपवणे नदीवर विजय बंधारा बांधण्यात आला आहे.
या उपक्रमात नाम फाउंडेशन संस्थेने मशीन सहकार्य त्याला लागणारे डिझेल ग्रामपंचायत चोरवणे-निवे यांनी केले.
नाम फाऊंडेशनचे पदाधिकारी प्रथमेश पोमेडकर, शाहनवाज शाह , अनुलोम संस्थेचे मयुरेश पाटणकर आणि ज्ञानेश्वर शिंदे साहेब, ग्रामपंचायत ग्रामसेवक गणेश पाडवी, माजी उपसरपंच प्रविण सावंत आणि शिक्षण क्षेत्रातील केंद्रप्रमुख जगताप सर यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली विजय बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले.
या बंधाऱ्याचे काम सलग तीन दिवसांत ग्रामस्थांच्या, विशेषतः महिलांच्या कठोर परिश्रमातून आणि श्रमदानातून पूर्ण करण्यात आले.
विशेष म्हणजे ग्रामविकास मंडळाचे पदाधिकारी व सभासद यांनीही गावात येऊन ग्रामस्थांसोबत श्रमदानात सहभाग घेतला. गावापासून दूर राहूनही आपल्या मातीशी असलेली नाळ जपत गावाच्या विकासासाठी पुढे येणं, ही खरोखरच अभिमानाची बाब आहे.
या कामांतर्गत नदीपात्रातील संपूर्ण गाळ आणि दगड काढून नदीची खोली ५ ते ६ फूट वाढविण्यात आली. ७० × १० फूट क्षेत्रफळाचा बंधारा बांधण्यात आला. बंधाऱ्याला पिचिंग करून त्यावर पहिल्या थरात माती टाकण्यात आली. त्यानंतर प्लॅस्टिक टाकून दुसऱ्या थरात माती टाकण्यात आली.
आज पाण्याचं महत्त्व प्रत्येकाला जाणवत आहे. पावसाचं पाणी योग्य प्रकारे अडवून ते जमिनीत जिरवणं, भूजलसाठा वाढवण्यासाठी प्रयत्न करणं आणि उपलब्ध जलस्रोतांचं संवर्धन करणं ही काळाची गरज आहे.
आज केलेलं श्रमदान हे उद्याच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. अशा उपक्रमांमुळे केवळ जलसंवर्धनालाच हातभार लागत नाही, तर गावकऱ्यांमध्ये एकजूट, सहकार्य आणि सामाजिक बांधिलकीची भावनाही अधिक दृढ होते.
या बंधाऱ्याच्या कामात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या ज्या व्यक्तींनी आणि संस्थांनी सहभाग घेतला, त्या सर्वांचे चोरवणे ग्रामस्थांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले.
हा विजय बंधारा दर्जेदार आणि मजबूत होण्यासोबतच गावाच्या सामूहिक प्रयत्नांचं प्रतीक ठरावा. या उपक्रमातून प्रेरणा घेऊन इतर गावांमध्येही अशा प्रकारचे जलसंवर्धनाचे उपक्रम राबवले जावेत आणि श्रमदानाच्या माध्यमातून गावाच्या विकासाला चालना मिळावी, हीच अपेक्षा. कै पदमश्री नानासाहेब पाटेकर यांचे स्वप्न व उद्दिष्ट पूर्ण करण्याचा वीडा नाम च्या पदाधिकारीनी उचलला असून रत्नागिरी जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती व उद्भवणारी पाणी टंचाई वर मात करणे साठी नाम फाउंडेशन चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गणेश थोरात व श्री मल्हार पाटेकर यांनी जिथे लोकांची गरज आहे व लोकसहभाग मिळेल अश्या ठिकाणी पाण्याचे दुरभिक्ष टाळण्याकरिता जे सि बी मशीन दिलेली आहे. इंधनाची व्यवस्था लोक सहभागातून करावयाची आहे ज्या ग्रामपंचायत मधील बंधारा नाला यातील गाळ काढून पिण्याच्या पाण्यासाठी, शेतीसाठी किंवा भुजल साठा वाढविण्यासाठी आवश्यक आहे त्यांनी श्री प्रथमेश पोमेंडकर 9561329260, श्री शाहनवाज शाह 9822820395 यांचे कडे संपर्क करावा.
