चिपळूण : चिपळूण तालुका प्रवासी रिक्षा चालक-मालक संघाच्या पुढाकाराने वालावलकर हॉस्पिटल येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘स्वामी समर्थ रिक्षा स्टॉप’चे उद्घाटन नुकतेच आमदार शेखर निकम यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी परिवहन विभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासनाचे प्रतिनिधी, रिक्षा संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने रिक्षाचालक उपस्थित होते.

या कार्यक्रमाला आमदार शेखर निकम, सावर्डे पोलीस स्टेशनचे श्री. पाटील, रत्नागिरीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, परिवहन अधिकारी अरविंद फुलारे, दत्तात्रय धनावडे, सावर्डेचे माजी सरपंच सुभाष मोहिरे, चिपळूण तालुका प्रवासी रिक्षा चालक-मालक संघाचे अध्यक्ष दिलीप खेतले, उपाध्यक्ष संजय जोशी आणि सचिव प्रशांत गोरिवले यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार शेखर निकम यांनी स्वामी समर्थ रिक्षा स्टॉपला मंजुरी मिळवून देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल परिवहन विभागाचे आभार मानले. रिक्षा व्यवसाय करताना चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सध्या व्यवसायाचे प्रमाण कमी झाल्याने रिक्षाचालकांना आर्थिक आणि व्यावसायिक पातळीवर तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांशी नम्रतेने वागणे, त्यांना चांगली सेवा देणे आणि आपला व्यवसाय प्रामाणिकपणे करणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच रिक्षाचालकांना कोणतीही अडचण निर्माण झाल्यास आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनीही उपस्थित रिक्षाचालकांना मोलाचे मार्गदर्शन केले. रिक्षा व्यवसायात शिस्त, सुरक्षितता, प्रवाशांशी सौजन्यपूर्ण वर्तन आणि वाहतूक नियमांचे पालन यांना विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. नव्याने सुरू झालेल्या रिक्षा स्टॉपला त्यांनी शुभेच्छा दिल्या.

या उपक्रमामुळे वालावलकर हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना, त्यांच्या नातेवाइकांना तसेच परिसरातील नागरिकांना रिक्षा सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. स्वामी समर्थ रिक्षा स्टॉपच्या वतीने चिपळूण तालुका प्रवासी रिक्षा चालक-मालक संघाचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

या कार्यक्रमाला चिपळूण पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत खेतले, आबा डोंगरे, सरपंच मीनाक्षी बागवे, सुभाष बागवे, भाऊ मोरे, रामदास भोजने, विठ्ठल दाते, महेंद्र डोंगरे, सुजित साळवे यांच्यासह अनेक रिक्षाचालक उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला.