लांजा: दिवाळीच्या सणानिमित्त महिलांनी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या विविध वस्तूंना ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लांजा नगरपंचायतीने पुढाकार घेतला असून महिलांच्या कलाकौशल्याचा जागर करण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून लांजा शहरात प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सावली कुरूप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवारी उपनगराध्यक्ष मिलिंद लांजेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात दिवाळीचा फराळ, आकर्षक आकाश कंदील, पणत्या, इमिटेशन ज्वेलरी, रेडिमेड कपडे अशा विविध वस्तूंचे स्टॉल उभारण्यात आले आहेत.

महिलांच्या कलागुणांना व उद्योजकतेला प्रोत्साहन देणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश असून या उपक्रमामुळे महिलांना व्यासपीठ मिळाले आहे. तसेच यामुळे महिला बचत गटांना आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी संधी देखील उपलब्ध झाली असून त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने एक पाऊल पडले आहे.

दरम्यान, उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी महिला व बालकल्याण सभापती प्रणाली तेली, मुख्याधिकारी अभिजित कुंभार, पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, नगरसेवक सचिन डोंगरकर, वैभव जोईल, योगेश कावतकर, रफिक नेवरेकर, नगरसेविका निधी गुरव, श्रद्धा तोडकरी, सुशीला कांबळे, प्रांजल यादव, नीलिमा कनावजे, साक्षी मानकर, नेहा राड्ये, दुर्वा भाईशेट्ये यांच्यासह महिला बचत गटांच्या सदस्य उपस्थित होत्या. तसेच प्रशासकीय अधिकारी अनघा भाटकर, गीतांजली नाईक, सहाय्यक प्रकल्प अधिकारी रिना आल्हाट आणि समुदाय संघटक सुशांत नाखरेकर उपस्थित होते.

उपक्रमाची सुरुवात लांजा नगरपंचायतीच्या बहुउद्देशीय सभागृहातून करण्यात आली असून २ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत हे प्रदर्शन नगरपंचायात कार्यालयासमोर सुरू राहणार आहे. लांजावासीयांनी या प्रदर्शनाला भेट देऊन दिवाळीची खरेदी करावी आणि महिला बचत गटांच्या उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन नगरपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे.