रोहा ( प्रतिनिधी ) : रोहे शहरातील वरसे, भुवनेश्वर व अष्टमी येथील गजबजलेल्या लोकवस्तीत एकाच दिवशी ६ ब्लॉक मध्ये दिवसाढवल्या घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी घटनास्थळावरून पोबारा केला.या घटनेनंतर अक्षरशः पोलिसांची झोप उडाली होती. मात्र रोहा पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली नेमलेल्या पोलीस पथकाने अगदी शिताफिने या सर्व चोऱ्यांचा छडा लावून तीन आरोपिंतांवर कारवाई करुन त्यांच्याकडून लाखो रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केले.त्यानंतर हस्तगत केलेला मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानुसार मूळ मालक फिर्यादी महिलांच्या पोलिसांनी स्वाधीन केले.
रोहे शहरातील नेहरूनगर येथील १ ब्लॉक,अष्टमी नाक्यारील नवीन वसाहती मधील ३ ब्लॉक तसेच भुवनेश्वर येथील चैतन्य अपार्टमेंट मधील २ ब्लॉक अशा ६ ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कडी कोयंडे व लॉक धारदार शस्त्राने तोडून उपकून त्यावाटे घरात प्रवेश करून कपाटील सामान अस्थव्यस्त करून कपाटामधून जवळपास ६ लाख रुपयेहुन अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन पलायन केल्याची घटना २६ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ५ वा. च्या सुमारास घडली होती.विशेष म्हणजे चोरटे इतके शातीर होते की त्यांनी अष्टमी येथील इमारतीच्या ब्लॉक मध्ये घरफोडी करण्यापूर्वी शेजऱ्यांना घटनेची माहिती समजू नये म्हणून लगतचे असलेले सर्व ब्लॉकच्या बाहेरून कढी कोयंडे लावून व दुर्बीणला स्टिकर चिटकवून चोरट्यांनी आपली मोहिम फत्ते केली.एकाच दिवशी ६ घरफोडीचे धक्कादायक प्रकार घडल्यानंतर घटनास्थळी पोलिस तातडीने दाखल झाले होते.त्याचप्रमाणे अलिबाग येथून श्वान पथक व ठसे तज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले होते. या घटनेनंतर रोहा पोलीस ठाण्यात राजेंद्र पांडुरंग गुरव ( रा. चैतन्य अपार्टमेंट ) यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र वेगाने फिरवत आरोपीना मुंबई येथून ताब्यात घेतले. व अधिक चौकशी केली असताना त्यांच्याकडून चोरी गेलेला माल हस्तगत करण्यात आला. त्यानंतर मा. रोहा न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी चोरीस गेलेले २१ तोळे सोन्याचे दागिने संबधित महिला वर्गाच्या स्वाधीन केले.पोलिसांच्या चोख कामगिरीमुळे चोरीस गेलेले लाख मोलाचे दागिने परत मिळाल्याने महिला वर्गातून समाधान व्यक्त होत असताना दिसून येत होता..
