मुंबई : कोकणातील विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतीचे यंदा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून बागायतदारांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करून केली. तसेच आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंबा निर्यातीत निर्माण झालेल्या अडचणींबाबतही त्यांनी शासनाचे लक्ष वेधले.

आ. निकम यांनी सांगितले की, रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास ९९ टक्के आंबा आणि काजू उत्पादनावर परिणाम झाला आहे. वाढलेली उष्णता, परागीकरणासाठी मधमाशांची घटती संख्या तसेच लोटे व खेड परिसरातील रासायनिक कंपन्यांमुळे निर्माण होणारे पर्यावरणीय परिणाम या विविध कारणांमुळे बागायतीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी पीकविमा घेतलेला नसल्याने त्यांना विमा भरपाई मिळणार नाही. त्यामुळे सर्व बागायतदारांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्याबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

तसेच आंबा निर्यातीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, कोकणातील आंबा मोठ्या प्रमाणावर दुबईसह आखाती देशांमध्ये निर्यात केला जातो. मात्र सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यातीमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. पर्याय म्हणून अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि कॅनडा या देशांमध्ये आंबा निर्यात करण्याचा विचार केला जात असला तरी विमान प्रवासाचे वाढलेले तिकीट दर शेतकऱ्यांसाठी परवडणारे नाहीत. त्यामुळे या तिकीट दरांबाबत शासनाने विशेष सवलत देण्याचा विचार करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

यावर उत्तर देताना मंत्री महोदयांनी सांगितले की, आ. शेखर निकम यांनी उपस्थित केलेला मुद्दा रास्त असून कोकणातील आंबा-काजू बागायतदारांच्या अडचणी शासनाच्या लक्षात आहेत. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यातीवर परिणाम होत असल्याने तसेच शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/DItHYh1PqCoHMZyGSxOioH