खेड : मुंबई–गोवा महामार्गावर काशीमठ नजीक काळकाई हॉटेलसमोर कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात तीन तरुण जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि. ७ मार्च) दुपारी घडली. जखमींना तात्काळ कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे ३.४८ वाजण्याच्या सुमारास विन्हेरे येथून खेडच्या दिशेने मोटरसायकलने येत असताना काशीमठ नजीक काळकाई हॉटेलसमोर एका कारचालकाने डिव्हायडर क्रॉस करण्याचा प्रयत्न केला. यावेळी समोरून येणाऱ्या मोटरसायकलस्वाराला कार अचानक आडवी आल्याने मोटरसायकल थेट कारवर जाऊन धडकली. या धडकेत मोटरसायकलवरील तिघेही तरुण जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिजखाली तैनात असलेली जगद्गुरु रामनंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान, नाणीज धाम यांची २४ तास अपघात मदतीसाठी उपलब्ध असलेली विनामूल्य रुग्णवाहीका तात्काळ घटनास्थळी पोहोचली. रुग्णवाहीकेचे चालक सुरज हंबीर यांनी जखमींना तातडीने उपचारासाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
या अपघातात चैतन्य रमेश पवार (वय २५), किरण गणेश पवार (वय २३) आणि संकेत अनंत पवार (वय २४) हे तिघेही विन्हेरे येथील रहिवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने वेळीच मदत मिळाल्यामुळे मोठी जीवितहानी टळली असून पुढील तपास सुरू आहे.
