रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांकडून उदय सामंत यांच्या प्रकृतीबाबत सविस्तर माहिती घेतली तसेच त्यांच्या कुटुंबीयांशीही चर्चा केली.
अलीकडेच तब्येतीत बिघाड झाल्याने उदय सामंत यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय उपचारांनंतर त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली असून सध्या त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. आवश्यक तपासण्या पूर्ण झाल्या असून उद्या त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांच्याशी संवाद साधत त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. “उदय सामंत हे अत्यंत कार्यक्षम आणि कर्तव्यदक्ष मंत्री असून त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे, ही दिलासादायक बाब आहे,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
दरम्यान, उदय सामंत यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची बातमी समजताच राज्यभरातून तसेच रत्नागिरी जिल्ह्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. उद्या डिस्चार्जनंतर ते पुन्हा कामकाजात सक्रिय होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
