दापोली :- गतवर्षीप्रमाणे या वर्षी दिनांक 21, 22 मार्च 2026 शनिवार, रविवार रोजी दापोलीमधे सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे.*
कोळथरे येथील सुप्रसिद्ध कै. कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठान मार्फत या दापोली सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले जाणार असून या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय असणार आहे. या सांस्कृतिक महोत्सवामध्ये दापोली परिसर आणि एकूणच कोकणातील संस्कृती, लोककला, विविध कला, सादर करणाऱ्या कलाकारांना प्लॅटफॉर्म मिळणार असून त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. दिनांक 21 रोजी, सायंकाळी 5:30 वाजता या महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेते श्री. देवदत्त नागे, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. नामदार आशिष शेलार, राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार श्री. योगेशदादा कदम, विधान परिषद आमदार मा. सौ. उमाताई खापरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. याच दिवशी सायंकाळी दापोलीची सांस्कृतिक विशेषता दाखविणारे काटखेळ, जाखडी यांचे सादरीकरण देखील असणार आहे. तसेच उद्घाटनानंतर दापोलीतील प्रतीथयश कलाकारांचा ‘भक्तीरंग’ या थीमवर आधारित सोहळा रंगणार आहे. भक्तीरंग या कार्यक्रमात नृत्य, नाट्य, संगीत, वादन, चित्रकला, गायन या सगळ्यांचा अनोखा संगम आणि सादरीकरण दापोलीकरांना अनुभवायला मिळणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेते श्री देवदत्त नागे हेदेखील रसिक प्रेक्षकांशी याच दिवशी संवाद साधणार आहेत.
२२ तारखेला दिवसभर चित्रकला आणि रांगोळी यांचे प्रदर्शन देखील असणार आहे. तर २२ च्या सायंकाळी ‘सूर तेच छेडिता’ सुप्रसिद्ध गायिका मधुरा कुंभार, ऋषिकेश रानडे, सुप्रसिद्ध ढोलकी वादक निलेश परब आर्चिस लेले, कमलेश भडकमकर यांच्या संचाचा सुरेल कार्यक्रम असणार आहे. या महोत्सवादरम्यान कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध कला स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. दोन प्रकारच्या स्पर्धा असतील एकल (individual) आणि सामूहिक (group). २० तारखेला दुपारी एकल स्पर्धामधील चित्रकला, रांगोळी, फोटोग्राफी आणि रिल्स या स्पर्धांचे आयोजन केलेले आहे.
२१ आणि २२ तारखेला सामूहिक मधील खालूबाजा, कोकणातील लोककला (काटखेळ, जाखडी, कोळी नृत्य इ.), नाट्यछटा व भजन इ. स्पर्धांचे भरगच्च आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा आयोजित करण्यामागे आपल्या परिसरातील कलाकार आणि कला यांना वाव मिळावा, ते अधिकाधिक लोकांसमोर यावेत आणि प्रोत्साहित व्हावेत हा उद्देश असल्याचे स्पर्धा संयोजक प्रीती वैद्य यांनी सांगितले.
सामूहिक स्पर्धासाठी बक्षिसे खालीलप्रमाणे –
प्रथम : १००००/- + चषक
द्वितीय: ७०००/- + चषक
तृतीयः ५०००/- + चषक
व्यक्तिगत (एकल) स्पर्धाची बक्षिसे :
प्रथम: ३०००/- + चषक
द्वितीय : २०००/- + चषक
तृतीय: १५००/- + चषक
तरी या सर्व स्पर्धांमध्ये अधिकाधिक कलाकारांनी, सांस्कृतिक मंडळे, भजनी मंडळे, महिला व युवा मंडळे यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन महोत्सवाचे संयोजक मिहीर महाजन यांनी समस्त दापोली तालुकावासियांना केले आहे. या कार्यक्रमाच्या आणि स्पर्धाच्या आयोजनामध्ये प्रामुख्याने युवा प्रेरणा कट्टा टीमचा सहभाग आहे.
