खेड (चंद्रकांत बनकर) :
खेड तालुक्यातील नांदगाव आणि खारी या गावांतील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांनी नुकताच शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना नेते तथा माजी मंत्री रामदास भाई कदम आणि राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी नव्याने शिवसेनेत दाखल झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे रामदास कदम आणि योगेश कदम यांनी स्वागत करत अभिनंदन केले.
या पक्षप्रवेशामुळे खेड तालुक्यातील राजकीय वातावरणात चांगलीच चर्चा रंगली आहे. नांदगाव आणि खारी गावांतील अनेक कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेची वाट धरल्याने स्थानिक पातळीवर शिवसेनेची ताकद आणखी वाढल्याचे मानले जात आहे.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रामदास भाई कदम यांनी शिवसेना ही सामान्य कार्यकर्त्यांची, जनतेच्या प्रश्नांवर लढणारी आणि विकासाला प्राधान्य देणारी संघटना असल्याचे सांगितले. गावोगावी विकासाची गती वाढविणे, सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणे आणि स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांनीही नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना, पक्षात येणाऱ्या प्रत्येकाला सन्मान आणि संधी दिली जाईल, असे स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते रामदास भाई कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या विकासात्मक कार्यपद्धतीमुळे प्रभावित होऊनच आपण शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची भावना नव्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
गेल्या काही वर्षांत खेड तालुक्यात राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांमुळे शिवसेनेबद्दल जनतेत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर नांदगाव आणि खारी गावांतील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या पक्षप्रवेशामुळे आगामी काळात खेड तालुक्यातील स्थानिक राजकारणात शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे. नांदगाव आणि खारी परिसरात या प्रवेशामुळे शिवसेनेला नवसंजीवनी मिळाल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.