नवी दिल्ली : भारत किंवा महाराष्ट्र सरकारवर आरोप करत नाहीये, वास्तव दाखवत्ये. मी माध्यमांचे आभार मानते की त्यांनी दबावाला बळी न पडता वस्तुस्थिती दाखवली आहे. आज भारतातला माणूस, गृहिणी अडचणीत आहे. या वास्तवापासू भारत सरकार का लपवतंय हे मला समजत नाहीये. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करेन की त्यांनी जर सगळी चॅनेल्स पाहिली, तर कुठे गॅप्स आहेत ते कळेल,असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.

सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या की,देशभरात LPG अडचणी सुरू आहेत. राज्याकडून दिल्या जाणाऱ्या माहितीत तुटवडा आहे. बारामती, शिरूर मधे मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. मग कमतरता, तुटवडा आहे हे सरकार का कबूल करत नाहीये, एलपीजीची यंत्रणा कोलमडली आहे, संसदेत त्यावर आम्ही चर्चेची मागणी करत आहोत. तुटवडा होत असेल तर सरकारने पुढे येऊन सर्वाना वास्तव काय ते सांगितलं पाहिजे, मारामाऱ्या व्हायला लागल्या आहेत. काय चाललंय महाराष्ट्रात आणि भारतात ? असा प्रश्न सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना उपस्थित केला आहे.

सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,हाताला गॅस नाही म्हणून अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. बारामतीत कमर्शियल गॅस कुठेही मिळत नाही. सगळ्या MIDC मधे 75 टक्के कामगार कमी केले आहेत कारण तिथे गॅस नाही. बारामती, पुणे, नाशिक, बीड, जळगाव, नागपूरमध्ये ही परिस्थिथी आहे. फक्त राज्यात नव्हे तर भारतातही सगळीकडे हीच परिस्थिती आहेत. रांगा लाऊन गॅस मिळायचा पण आता मिळत नाहीये.डेटा दिसतोय सगळीकडे, तुटवडा तर आहेच ना, कशाची वाट बघतंय महाराष्ट्र आणि भारत सरकार?, हा राजकीय विषय नाही, सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी सरकारला विनंती आहे. सभागृह सुरू आहे त्यामुळं सरकारने निवेदन करण्याची गरज आहे,अनेक दिवसांपासून राहुल गांधी जे वारंवार बोलत आहेत. ते सत्य होताना दिसतंय, असेही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.

सुप्रियाताई सुळे यांना बारामती पोटनिवडणुकीबाबत प्रश्न विचारला. यावर सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, आम्ही बारामतीची जागा लढणार नाही, विषयच येत नाही. मी याआधी देखील सांगितलं आहे. सुनेत्रा वहिनींच्या विरोधात उमेदवार देण्याचा प्रश्नच येत नाही. महाविकास आघाडीचीही बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देण्याची भूमिका नाही, असे सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले आहे.