दापोली (चंद्रशेखर जोशी) : स्थळ होते डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे सर विश्वेश्वरैय्या सभागृह. कार्यक्रम सुरु होता दापोली सांस्कुतिक महोत्सवाचा उद्घाटन कार्यक्रम.
अचानक एक संकासूर प्रेक्षकामधून मुलांची फिरकी घेत व्यासपीठावर येतो. तेथे कै. मामा महाजन स्मृती स्मृतिप्रतिष्ठान, कोळथरेचे उपाध्यक्ष मिहीर महाजन हे निवेदन करत असताना हा संकासूर त्यांच्याजवळ जातो व त्यांना हातात असलेला दोरीने मारायला सुरुवात करतो. उपस्थित प्रेक्षकांना हा काय प्रकार सुरु आहे हेच समजत नाही. तर व्यासपीठावर बसेलेले राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम, जिल्हापरिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, तहसीलदार अर्चना बोंबे व अन्य मान्यवर त्या संकासुराकडे बघतच बसतात. त्यानंतर सुरु असलेला हा सस्पेन्स संपतो व तो संकासूर डोक्यावर घातलेली टोपी काढतो व बोलायला सुरु करतो तो असतो या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण “जय मल्हार” मालिका फेम देवदत्त नागे. या सर्व प्रकारामुळे उपस्थित प्रेक्षक व व्यासपीठावर असलेले मान्यवर चकितच होतात. त्यानंतर देवदत्त नागे आपले मनोगत व्यक्त करताना दापोली तालुक्यातील पर्यटन स्थळांविषयी भरभरून बोलतात.