लांजा : मुंबई–गोवा महामार्गावर लांजा तालुक्यातील आंजणारी पुलाजवळील तीव्र उताराच्या ठिकाणी कंटेनर ट्रेलर पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी सुमारे ७.१५ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अवंतिका ट्रान्सपोर्ट, कलंबोली येथील कंपनीच्या मालकीचा १४ टायरी कंटेनर ट्रेलर (क्र. एमएच ४६ बीबी २३७०) चालक सुरेंद्र कुमार दुबे (वय ४८) हे मुंबईहून गोव्याच्या दिशेने घेऊन जात होते. आंजणारी पुलाजवळील तीव्र उताराच्या भागात पोहोचताच भरधाव वेगातील ट्रेलरवरील त्यांचा ताबा सुटल्याने ट्रेलर रस्त्यावर पलटी झाला. या अपघातात चालक दुबे यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, स्थानिक नागरिक व पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती.
मृत चालक सुरेंद्र कुमार दुबे हे मूळ उत्तर प्रदेशातील गडेरिया (कोचिया पुरे) येथील रहिवासी असून सध्या मुंबईतील अँटॉप हिल, वडाळा येथे वास्तव्यास होते.
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब), १०६ (१) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत सुरेंद्र दुबे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे करत आहेत.