लांजा : संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मागील एका वर्षात लांजा तालुक्यातून विविध प्रस्ताव प्राप्त झाले असून पात्र लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून राबविण्यात आली आहे. माहे फेब्रुवारी २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत तालुक्यातून एकूण २०७ अर्जदारांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. यापैकी पात्र १७८ प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून अपात्र २९ प्रस्ताव नामंजूर करण्यात आल्याची माहिती लांजा तहसील प्रशासनाकडून देण्यात आली.
तहसील कार्यालयात प्राप्त झालेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या प्रस्तावांमध्ये विविध घटकांचा समावेश होता. यामध्ये दिव्यांग निराधार गटातील आलेल्या ७७ प्रस्तावांपैकी ६५ प्रस्ताव मंजूर करण्यात आले, तर १२ प्रस्ताव नामंजूर झाले. विधवा महिलांच्या ३३ प्रस्तावांपैकी २२ प्रस्ताव मंजूर झाले असून ११ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले. तसेच अविवाहित महिलांचे ४ प्रस्ताव प्राप्त झाले होते आणि ते सर्व ४ प्रस्ताव मंजूर करण्यात आले.
याशिवाय दुर्धर आजार असलेल्या लाभार्थ्यांच्या ६ प्रस्तावांपैकी ५ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. श्रावणबाळ योजनेअंतर्गत ८४ प्रस्ताव प्राप्त झाले होते, त्यापैकी ७९ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत प्राप्त ३ प्रस्तावांपैकी सर्व ३ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. तर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेचा एकही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही.
दरम्यान, सर्व प्रस्तावांची छाननी करून लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती पडताळणी करण्यात आली होती. त्यानंतर लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त अर्जांची तपासणी करून निकषांत बसणाऱ्या पात्र अर्जदारांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले.
संजय गांधी निराधार योजना ही समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, निराधार, दिव्यांग आणि विधवा महिला अशा विविध घटकांना आधार देणारी योजना असून तालुक्यातील नागरिकांनी शासनाच्या अशा योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांनी केले आहे.