नवी दिल्ली : मंत्रिमंडळातील मंत्री एकमेकांना सिलिंडरवरून पत्र लिहित आहेत. हे संकट (क्रायसिस) आहे. भारत सरकारने वास्तव सांगावे. लोक अडचणीत आहेत. जगात युद्ध सुरू असल्याची जाणीव आहे. मागील आठवड्यात सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यावेळी आम्ही सहकार्याची भूमिका घेतली. देश अडचणीत असेल, तर सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून सरकारला सहकार्य करायला आम्ही तयार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्याध्यक्षा, महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सर्वसामान्य माणूस अडचणीत आहे. संभाजीनगरमध्ये रिक्षाचालक मंत्र्यांच्या दराने रिक्षा चालवत आहेत. आम्ही अडचणीत आहोत. हॉटेलमध्ये व्यवस्थित जेवण मिळत नाही. मुलांच्या कॉलेजच्या खाणावळी व कॅन्टीनमध्येही जेवण व्यवस्थित मिळत नाही. सहकार्य करायचे असेल, तर सरकारने पारदर्शकपणे अडचण असल्याचे मान्य करावे लागेल. लोढा यांनी पत्र लिहिले. लोढाजींनी सामान्य माणसाचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. मी त्यांचे आभार मानते, असेही त्यांनी सांगितले.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, “कनेक्शन द्या, आमची तयारी आहे. सरकारने आम्हाला कनेक्शन द्यावे. तुम्ही मायबाप सरकार आहात. तुम्ही कनेक्शन द्या, आम्ही तयार आहोत. आम्हाला कनेक्शन मिळाले की झाले,” असे त्या म्हणाल्या.
आदित्य ठाकरे मोहित कंबोज यांच्या कार्यक्रमाला गेले, या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “मी ज्या संस्कारात वाढले, तिथे विरोधकाला शत्रू मानत नाही. मतभेद असावेत, पण मनभेद असू नयेत. ‘मनभेद’ आणि ‘शत्रू’ हे शब्द लोकशाहीत बसत नाहीत. कोणी कोणाच्या लेकीच्या वाढदिवसाला गेले, त्यात एवढे बोलण्यासारखे काय आहे? देशासमोर अनेक मोठी आव्हाने आहेत. महागाई, डिझेल यांसारखे अनेक मुद्दे आहेत. मला वाटते, तुमची गल्लत होत आहे. राजकीय विषय आणि कौटुंबिक समारंभ हे दोन वेगळे विषय आहेत. कोणी कोणाच्या लेकीच्या वाढदिवसाला गेले, त्यात गैर काय? हीच तर महाराष्ट्राची संस्कृती आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “मी तुमच्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानते. मुख्यमंत्र्यांना विनंती करते की, माध्यमांमधून मांडला जात असलेला हा मुद्दा महत्त्वाचा आहे. महिलांचे फोटो बाहेर जाऊ नयेत. एक नागरिक म्हणून मुख्यमंत्र्यांना विनंती करते की, तुम्ही कारवाई केली पाहिजे. माध्यमांनी या विषयात जो संवेदनशीलपणा दाखवला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. पोलिस हे जनतेच्या संरक्षणासाठी असतात, धक्काबुक्की करण्यासाठी नव्हेत. साताऱ्यात शंभूराज देसाई आणि मकरंद आबा पाटील यांच्यासोबत पोलिसांकडून झालेली धक्काबुक्की ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
