लांजा (गोविंद चव्हाण) — परशुरामाच्या पवित्र कोकणभूमीत व नाणीज येथील प.पू. स्वामी नरेंद्र महाराज यांच्या मठात विश्व हिंदू परिषद यांच्या वतीने व्याख्यान आयोजित करण्यात आले. यामध्ये विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, विधानसभा समितीचे अध्यक्ष (दिल्ली) व सर्वोच्च न्यायालयाचे विधीतज्ज्ञ ॲड. अलोक कुमार यांनी आपल्या मनोगतातून विचार मांडले.

महाराष्ट्रातील पालघर येथे धर्मांतरण होत असते. त्या ठिकाणी अशिक्षित आणि गरीब समाज आहे. तेथे ख्रिश्चन पाद्री जाऊन त्या समाजात प्रबोधन करत असतात. सुरुवातीला एखाद्या आजारावर साध्या गोळ्या देऊन पाहतात. नंतर ‘येशूचे नाव घेऊन पुन्हा या गोळ्या घ्या, म्हणजे तुमचे आजार बरे होतील’, असे सांगून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त केले जाते. पालघरमध्ये अशा प्रकारे २५१ कुटुंबांचे धर्मांतरण करण्यात आले. परंतु विश्व हिंदू परिषदेने या २५१ कुटुंबांना पुन्हा हिंदू धर्मात आणले.

हिंदू धर्म गायीला माता मानतो, परंतु तिचे रक्षण करण्यास कचरतो. भारतातून मांसाची निर्यात मोठ्या प्रमाणात होते. त्यासाठी कत्तलखान्याकडे जाणाऱ्या जनावरांना रोखण्यासाठी तरुण मंडळी तयार केली पाहिजेत.

हिंदू धर्माचे शिक्षण घराघरांतून मुलांना लहान वयातच दिले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून प्रार्थना करावी, तसेच एकत्र भोजन करावे. या गोष्टी कर्तव्य म्हणून कुटुंबाने पार पाडल्या पाहिजेत. प्रत्येक गावातील वाडी-वस्तीवर तसेच गावातील मुख्य मंदिरात ठराविक वेळी लहानांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सर्वांनी एकत्र येऊन नामस्मरण करावे व हिंदू धर्माबद्दल मार्गदर्शन घ्यावे. यासाठी कथा-कीर्तनांचे आयोजन व्हावे आणि ती जिथे जिथे असतील, तिथे जाऊन ऐकावीत, असे अलोक कुमार यांनी सांगितले.

यानंतर कानीप नाथ यांनी आपले मनोगत व्यक्त केले व आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमासाठी विवेक वैद्य, कुमार जोडलेकर, उदय चितळे, जयंत देसाई, उमाताई देवळे, अशोक पाखरे, दीपक जोशी, बिजेश शुक्ला हे सर्व जिल्हा कार्यकारिणीचे मान्यवर उपस्थित होते. तसेच लांजा येथून ह.भ.प. मनोहर रणदिवे, ह.भ.प. गोविंद चव्हाण, सुरेश पाध्ये, प्रियावंदा जेधे, घाटे वहिनी, ऋषिकेश किणरे, श्री प्रल्हाद आसीलोक आदी उपस्थित होते.