मुंबई – दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने, अर्थात एसटी महामंडळाने, तिकीटांमध्ये हंगामी दरवाढ केली आहे. येत्या १५ एप्रिलपासून ही दरवाढ लागू होणार आहे. त्यामुळे शाळांच्या सुट्ट्यांच्या काळातच ही दरवाढ लागू होणार असल्याने शहराकडून गावाकडे प्रवास करणाऱ्यांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे.

एसटी महामंडळाच्या माहितीनुसार, यंदा महामंडळाकडून एसटीच्या तिकीटांसाठी १० ते १५ टक्के दरवाढ अपेक्षित होती. त्यानुसार, अंतिमतः १० टक्के दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना शंभर रुपयांमागे १० रुपये अशी दरवाढ लागू असणार आहे. सुट्ट्यांच्या काळात दरवाढ हा एसटीचा उत्पन्नवाढीचा महत्त्वाचा स्रोत आहे. येत्या १५ एप्रिल ते १५ जून या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी ही १० टक्के तिकीट दरवाढ लागू असणार आहे. त्यामुळे १५ तारखेपासून प्रवास करणाऱ्या सर्वांना वाढीव तिकिटांनुसार प्रवास करावा लागणार आहे.

एसटीने दरवाढ केल्याने आता याचा परिणाम म्हणून खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या बसच्या तिकिटांतही वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात सर्व प्रकारच्या प्रवासी बसने प्रवास करण्यासाठी वाढीव खर्च करावा लागू शकतो. दरम्यान, दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात दरवर्षी एसटीकडून हंगामी दरवाढ केली जाते. त्यानुसार, यंदाच्या उन्हाळी सुट्ट्यांनिमित्त १० टक्के तिकीट दरवाढ करण्यात आली असून ही दरवाढ साध्या आणि जलद बससाठी लागू असणार आहे. शिवनेरी, शिवशाही, शिवाई, हिरकणी आणि शयनयान बस यांना ही दरवाढ लागू असणार नाही, असेही एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.