चिपळूण : तालुक्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या आंबा काजू बागांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करणारे निवेदन शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर यांनी चिपळूणच्या तहसीलदारांना दिले आहे.

या निवेदनात श्री अडरेकर यांनी म्हटले आहे की,तालुक्यात अलीकडे झालेल्या अवकाळी पाऊस व अचानक बदललेल्या वातावरणामुळे येथील आंबा व काजू बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागातील अनेक शेतकरी हे पूर्णतः आंबा व काजू उत्पादनावर अवलंबून असून, या नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांच्या उदरनिर्वाहावर गंभीर परिणाम झाला आहे.
अनेक ठिकाणी फुलोरा गळणे, फळे खराब होणे तसेच उत्पादनात मोठी घट होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून शासनाकडून तात्काळ मदतीची अपेक्षा आहे.
म्हणून आपणास विनंती करण्यात येते कीः
१. तालुक्यातील सर्व बाधित गावांमध्ये त्वरित पंचनामे करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत.
२. नुकसानीचे अचूक सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना योग्य व न्याय्य मोबदला देण्यात यावा.
३. प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यात यावा.
शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण तातडीने सकारात्मक कार्यवाही कराल, अशी अपेक्षा आहे असे श्री अडरेकर यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे.