खेड : तालूक्यातील सह्याद्रिच्या कुशीत,स्वयंभू नागेश्वर आणि परशुरामाच्या पावन भूमीत वसलेले निसर्गरम्य साखर गाव,आणि या गावचे ग्रामदैवत व जागृत देवस्थान ,पंधरागावच्या ऐतिहासिक गादीचा वारसा असलेली आदीमाया आदीशक्ती श्री कालिकामाता देवीचा वार्षिक यात्रौत्सव चैत्र कृष्ण पक्ष चतुर्थी सोमवार दि.०६ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
याप्रसंगी सकाळी ठिक आठ वाजता गावातील बहूसंख्य ग्रामस्थ देवीच्या वार्षिक परंपरेनूसार मानकऱ्यांकडे जाऊन त्यांचे शुभहस्ते लाटेची विधीवत पुजा करून घेतात. आणि त्यानंतर देवीची लाट तोडून देवीच्या यात्रौत्सवास सुरवात करतात. दुपारी ठिक ११ वाजता मानकऱ्यांच्या वाडीतून गावातील ग्रामस्थ मोठ्या उत्साहात लाटेची मिरवणूक काढत मंदीरस्थळी आणतात.व सायंकाळी ठिक चार वाजता ढोल ताशांच्या गजरात लाट खरखांबावर चढवली जाते. सायंकाळी सहा वाजता पंचक्रोशीतील निमंत्रीत दैवतांचे आगमन परंपरेनुसार ठरल्याप्रमाणे गावचे तीन मानकरी चौकीचीवाडी,जांभूळवाडी व बामणवाडी या तीन वाड्यांमध्ये आगमन होते. याप्रसंगी प्रत्येक वाडीतील मानकरी मंडळी यांच्या तर्फेनिमंत्रित देवतांचे भक्तिभावाने पुजन करून, महाप्रसादाचा नैवेद्य अर्पण केला जातो. आणि या दैवतांकडे वाडीतील भाविकांनी केलेले नवस फेडले जातात.आणि दैवतांच्या पालखी सोबत आलेल्या सर्व खेळ्यांना महाप्रसाद दिला जातो त्यानंतर रात्री साडेआठ वाजता सर्व निमंत्रित दैवतांच्या पालख्या यात्रेस्थळी येण्यास निघतात.
तसेच सायंकाळी सात वाजता देवीची महाआरती करून लाट फिरविण्याचा कार्यक्रम केला जातो. रात्री ठिक नऊ वाजता परीसरातील देव दैवतांच्या पालख्यांचे आगमन व पालख्यांच्या गळाभेटीने स्वागत होते. सर्व पालख्यांच्या आगमनानंतर ढोलताशांच्या गजरात,सनईच्या मंगळ सुरात व फटाक्यांच्या आतषबाजीत निमंत्रित दैवतांच्या मानाप्रमाणे पालख्या नाचवत मंदीराच्या सभोवती प्रदक्षिणा घालून मनमोहक, नयनरम्य छबिना काढला जातो.आणि हा छबिना सोहळा पाहण्यासाठी जिल्ह्यातील खेड,चिपळूण,दापोली,मंडणगड,गुहागर या तालूक्यांतील तसेच दुर-दुरवरून भाविक भक्तजन मोठ्या उत्साहाने येतात. गणेश पुराणांमध्ये सर्व वार्षिक तिथींची माहिती दिली आहे.त्यामध्ये चैत्र कृष्ण पक्ष चतुर्थी ही सर्व श्रेष्ठ तिथी असून ती सर्व तिथींची माता आहे.असा उल्लेख आहे. अशा या सर्व श्रेष्ठ तिथीला साखर गावचे आराध्य दैवत श्रीकालिकामातेची यात्रा होते.हे देवीचे महात्मे आहे.यामुळे पंधरागावात साखर गावचे महत्व आहे.
आई कालिकामाता नवसाला पावणारीआणि एक जागृत देवी म्हणून प्रसिद्ध आहे. नुकतेच देवीचे हेमांडपंथीय सुंदर कलाकृती ,नक्षीकाम केलेले पाषाणी मंदीर बांधले आहे. विशेष या मंदीराचे प्रवेशद्वार हे येणाऱ्या भाविकांचे लक्ष आकर्षित करते.
मंगळवार दि.०७ एप्रिल २०२६ रोजी,चैत्र कृष्ण पंचमीला देवीचा समा होणार आहे.त्यामध्ये तीन वाडीतील मानकरी यांचे हस्ते गावचे ग्रामदैवत श्रीकालिकामाता आणि श्रीझोलाई माता तळवट – जावळी यांच्यामध्ये एक चौक भरून त्याचे मानकऱ्यांकडून पुजन केले जाते. आणि झोलाईमाता देवीची खणानारळाने ओटी भरून ओटीचा प्रथम मान दिला जातो.त्या नंतर सर्व निमंत्रित दैवतांना ओटीचा मान देण्यात येतात. यास्थळी गळ लावण्याची परंपरा असल्याने परंपरेनुसार मानकऱ्यांच्या हस्ते गळाची पुजा केली जाते आणि तो गळ आणि लाट खरखांबा सभोवताली फिरविले जाते.व लाटेची दिशा चढवतेवेळी दक्षिण-उत्तर असते ती पश्चिम-पुर्व दिशेला करून ठेवण्यात येते. यानंतर निमंत्रित मंदीरातील सर्व दैवतांच्या पालख्या पाठवणीसाठी एक-एक करून बाहेर काढून तसेच त्यांच्या समवेत आई कालिकामातेची पालखी बाहेर काढून या सर्व दैवतांना ढोल ताशांच्या गजरात सन्मानाने सोडण्यात येते.आणि अशा प्रकारे यात्रौत्सव पूर्णत्वास जातो.
यात्रेचा मनमोहक,नयनरम्य छबिना सोहळा आणि संगिताची राणी कराडकर,आगाशीवनगर, कराड यांचा सुप्रसिध्द लोकनाट्य तमाशा पाहण्यासाठी सहकुटूंब,सहपरिवार,मित्रमंडळीसह उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा.आणि यात्रौत्सवाचा आनंद व्दिगुणित करावा असे आग्रहाचे निमंत्रण समस्त साखर गाव ग्रामस्थ कमिटी आणि ग्रामीण व मुंबई ग्रामस्थ मंडळी यांनी केले आहे.
साखर गावच्या श्रीकालिकामाता देवीचा ६ एप्रिलला भव्य वार्षिक यात्रौत्सव !
