खेड (प्रतिनिधी) : – तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ किल्ले रसाळगडकडे जाणारा रस्ता आज अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे या रस्त्याची इतकी दुरवस्था झाली आहे की, येत्या पावसाळ्यात संपूर्ण वाहतूक ठप्प होण्याची भीती आता स्पष्टपणे व्यक्त होत आहे.
दररोज शेकडो पर्यटक आकर्षित करणाऱ्या रसाळगड किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर मोठमोठे खड्डे, उखडलेला डांबरीकरण आणि संरक्षण भिंतींचा अभाव यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः आवळीचा पेडा ते रसाळगड बसस्टॉप हा इजिमा ३७ मार्ग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून अपघातांची मालिका सुरू आहे. गेल्या पाच वर्षांपासून स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटकप्रेमी नागरिक प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा नियोजन यंत्रणा केवळ कागदोपत्रीच राहिली असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. परिणामी संतप्त नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
आता संघर्ष अपरिहार्य!
या गंभीर समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १ मे २०२६ रोजी खेड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. हे आंदोलन महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच यांच्या नेतृत्वाखाली होणार असून, प्रशासनाला जागे करण्यासाठी निर्णायक लढा उभारला जाणार आहे.
या आंदोलनात रसाळगड परिसरातील ग्रामस्थ, खेड तालुक्यातील नागरिक आणि सर्व पर्यटन प्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष रामचंद्र आखाडे यांनी केले आहे.