अलिबाग ( धम्मशील सावंत ) : जिल्हा परिषदेत पार पडलेल्या समाजकल्याण, महिला व बालकल्याण तसेच शिक्षण व पाणीपुरवठा विभागाच्या बैठकीत विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. शिक्षण क्षेत्रातील त्रुटी, पाणीपुरवठ्याच्या अपुऱ्या योजना आणि आरोग्य सुविधांच्या कमतरतेवर सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

जलजीवन मिशनअंतर्गत अनेक योजना अपूर्ण असून काही ठिकाणी टाक्या बांधूनही पाणीपुरवठा सुरू नसल्याचे स्पष्ट झाले. “काम पूर्ण होईपर्यंत ठेकेदारांना पैसे दिले जाणार नाहीत तसेच अपूर्ण काम करणाऱ्यांना ब्लॅकलिस्ट केले जाईल,” असा इशारा देण्यात आला. मोरबे धरणाचे पाणी २३ स्थानिक गावांना मिळत नसल्याची बाबही पुढे आली. पोलादपूर तालुक्यात टँकरवर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठ्याबाबतही नाराजी व्यक्त झाली. उमठे धरणाच्या गाळउपसा व दूषित पाणीपुरवठा यावरही जिल्हा परिषद सदस्य डॉ. सचिन राऊळ यांनी आवाज उठविला. आरोग्य विभागातही गंभीर त्रुटी आढळल्या. तळाशेत उपकेंद्र रात्री बंद राहते, तर सुडकोळी PHC येथे डॉक्टर नसल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. रेबीजसह आवश्यक लसी व औषधे उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. धोकवडे PHC इमारतीची पडझड होत असून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचेही निदर्शनास आले.

याशिवाय, रायगड किल्ल्यावर निवासव्यवस्था, पाचाड येथील जिजाऊ माता समाधी निधीचा योग्य वापर, नद्यांतील गाळ काढणे, MIDC पाणीटाकी व कचरा व्यवस्थापनासाठी निधी तसेच पाली येथे ज्येष्ठ नागरिक भवनासाठी जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भातही चर्चा झाली. एकूणच, जिल्ह्यातील मूलभूत सुविधांबाबत प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा या बैठकीत देण्यात आला.

RTE प्रवेश प्रक्रियेत गैरप्रकार होत असल्याची बाब समोर येत असून, “श्रीमंत कुटुंबातील लोकच प्रवेश घेत आहेत,” असा आरोप करण्यात आला. याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्ह्यातील ६७४ जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या व शिक्षकांची संख्या याचा आढावा घेऊन पालकांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. तसेच शिक्षक भरती राज्य शासनाकडून होत असल्याने रिक्त पदांची मागणी तातडीने पाठविण्याचे ठरले. यावेळी पाणीपुरवठा विभागावरही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.