मुंबई : महाराष्ट्रातील जनतेचे जे मुद्दे आहेत, त्यावर आक्रमकतेने रस्त्यावर उतरून जनतेचे प्रश्न सत्तारूढ पक्षाकडून सोडवून घेण्यासाठी पक्ष म्हणून आम्ही पुढे येणार आहोत. पक्षाच्या मागे कार्यकर्ता आजही सक्षमपणे उभा आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले.
शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. गेल्या आठवड्यात आम्ही संपूर्ण जिल्ह्यांच्या बैठका घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत प्रत्येक सेलच्या बैठका सुरू आहेत. उद्या मुंबईत सेलची बैठक होणार आहे. सक्षम कार्यकर्त्यांची आम्ही नियुक्ती करत आहोत. महाराष्ट्रभर आम्ही दौरे करणार आहोत, असे ते म्हणाले.
शशिकांत शिंदे म्हणाले की, पक्षाच्या मागे कार्यकर्ता आजही सक्षमपणे उभा आहे. निवडणुकीच्या प्रक्रिया सातत्याने लागल्यामुळे पक्ष संघटनेबाबतचे निर्णय प्रलंबित होते. राज्याची आणि जिल्ह्याची संघटनात्मक रचना यांचा आढावा आम्ही घेतला आहे. आढावा घेत असताना काही जिल्हा पातळीवरील बदल करण्याच्या सूचना आम्ही केल्या आहेत. राज्य पातळीवरील बदलांबाबत सर्वजण बसून आम्ही निर्णय घेणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
शशिकांत शिंदे म्हणाले की, समरजीत घाडगे हे भाजपचेच होते. तिकिटासाठी ते आमच्याकडे आले होते. निवडणूक लढवून ते पुन्हा भाजपमध्ये गेले. मुश्रीफ असताना घाडगे यांचा प्रवेश झाला, म्हणजे महायुतीमध्ये भविष्यात मित्रपक्षांना दिलेला हा संकेत आहे, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
पुढे बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, सातारा प्रकरणात माझी आणि माझ्या पक्षाची मोर्चा काढण्याची तयारी आहे; पण समोरच्या दोन पक्षांची भूमिका अजूनही माहित नाही, असे ते म्हणाले.