कोयंबतूर/मुंबई : तामिळनाडू विधानसभेच्या एकूण 234 जागांपैकी 18 जागांवर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून, उर्वरित 216 जागांवर एनडीएला रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाचा दृष्टिकोन दक्षिणेतील जनतेलाही पटलेला आहे. एनडीए सरकारने देशाचा वेगाने केलेला विकास पाहून दक्षिणेतही एनडीएचा महाविजय होणार आहे. अभिनेते विजय यांनी तामिळनाडूत सर्व जागांवर उमेदवार उतरविल्याने मतविभागणीचा लाभ भाजप आणि एनडीएला मिळणार आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत तामिळनाडूतील स्टॅलिन यांचे द्रमुक सरकार उलथवून टाका, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.
कोयंबतूर जिल्ह्यातील तिरुपूर नॉर्थ विधानसभा मतदारसंघातील रिपब्लिकन पक्षाच्या महिला उमेदवार के. कार्तिकादेवी यांच्या निवडणूक प्रचार रॅलीला संबोधित करताना ना. रामदास आठवले बोलत होते. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष फादर एन. सुसाई आणि अनेक रिपब्लिकन पदाधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले हे दोन दिवसांच्या तामिळनाडू दौऱ्यावर आले असून, आज त्यांनी कोयंबतूर आणि नामक्कल जिल्ह्यातील विविध मतदारसंघांत रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांचा तसेच भाजप-प्रणीत एनडीए उमेदवारांचा प्रचार केला. रिपब्लिकन पक्षाच्या तामिळनाडूमध्ये 18 उमेदवारांपैकी 5 उमेदवार हे अनुसूचित जातीचे, 11 उमेदवार हे इतर मागासवर्गीय असून, 2 उमेदवार हे मुस्लिम आहेत.
तामिळनाडू हे दक्षिणेतील महत्त्वाचे राज्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप-प्रणीत एनडीए यंदा तामिळनाडू, पाँडिचेरी आणि केरळ या सर्व राज्यांत विजय मिळवून एनडीएचा दक्षिण विजय निश्चित होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने 57 कोटी लोकांची बँक खाती उघडली आहेत. 50 कोटी लोकांना मुद्रा योजनेचा लाभ दिला आहे. 6 कोटी लोकांना उज्ज्वला योजनेद्वारे सिलेंडर गॅस दिला आहे. 4 कोटी लोकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळाला आहे. देशभरातील 80 कोटी लोकांना मोफत रेशन देण्याची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवली आहे. देशभरातील अनेक रस्ते चांगले करण्यात आले असून देशाची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर आली आहे. देशात विकास झपाट्याने होत आहे. भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन हे तामिळनाडूचे सुपुत्र आहेत. तामिळनाडूच्या जनतेला तामिळनाडूचे सुपुत्र उपराष्ट्रपती झाल्याचा अभिमान आहे. तामिळनाडूच्या यंदाच्या निवडणुकीत सुपरस्टार अभिनेते विजय यांनी आपल्या पक्षाचे उमेदवार सर्व जागांवर उभे केले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मतांची विभागणी होणार आहे. याचा लाभ एनडीएला होणार असल्याचे ना. रामदास आठवले म्हणाले.
मोदींनी अनेक चांगल्या योजना राबविल्यामुळे देशाचा विकास होत आहे. देशाच्या विकासाचे राजकारण जनतेला आवडणारे असल्याने तामिळनाडूत जनता यंदा एनडीएला महाविजय मिळवून देईल, असा विश्वास ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
महिलांना संसदेत राजकीय आरक्षण देणारे महिला विधेयक संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी मंजूर करणार असून, महिलांच्या आयुष्यात क्रांती घडवणारे हे विधेयक आहे. त्यामुळे देशभरातील महिला या विधेयकावर खुश आहेत. तामिळनाडूतील महिला सुद्धा या विधेयकामुळे आपल्या मतांचे दान एनडीए उमेदवारांना देतील. त्यामुळे तामिळनाडूमध्ये एनडीएचा महाविजय होईल. यंदाच्या निवडणुकीत द्रमुकचा निश्चित पराभव होईल, असे ना. रामदास आठवले यावेळी म्हणाले.
