रसायनी ( राकेश खराडे ) : पाताळगंगा येथील रिलायन्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे सुपुत्र उद्योगपती अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त पाताळगंगा रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने रसायनी पाताळगंगा परिसरात गुरुवार दिनांक 9 एप्रिलपासून तीन दिवस विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.

गुरुवारी पाताळगंगा रिलायन्स कंपनीतील म्हसोबा मंदिरात अभिषेक, मंत्रजप करून व्यवस्थापनाकडून अनंत अंबानी यांना दीर्घायुष्य लाभो असे हात जोडून साकडे घातले गेले. यानंतर दुपारी कैरे आदिवासी वाडीतील 45 कुटुंबांना, बोरीवली वाडीतील 17 तसेच आसपासच्या वाड्यांतील असे एकूण 217 कुटुंबांना महिनाभर पुरेल इतके किराणा सामानाचे किट रसायनी पाताळगंगा व नागोठणे रिलायन्सचे ग्रुप प्रेसिडेंट अविनाश श्रीखंडे, साईट प्रेसिडेंट सुंदररंजन रंगराजन, एचआर हेड थॉमस इन्सो, विशाल गडाख, फायबर प्रेसिडेंट पंकज यादव, कॉर्पोरेट अफेअर्सचे संतोष विचारे, सुमित बरमण आदींच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी माजी सरपंच अविनाश पाटील, माजी सरपंच अशोक मुंढे, नंदकुमार पाटील उपस्थित होते. वाटपप्रसंगी अविनाश श्रीखंडे यांनी सदर वाड्यांना सलग सहा महिने किराणा सामानाचे किट वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले. अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त लोधिवली टाऊनशिप मंदिरात दिवसभर मंत्रजप सुरू होते. सायंकाळी लोधिवली व बोरीवली मंदिरात संगीत भजन व ग्रामस्थ भजनाचा कार्यक्रम झाला. परिसरात मिठाई वाटप करण्यात आली.

रात्री लोधिवली टाऊनशिपमध्ये कलात्मक कार्यक्रम होऊन कामगार कुटुंबांना अन्नदान करण्यात आले. यावेळी रिलायन्स पाताळगंगा व्यवस्थापनाकडून केक कापून अनंत अंबानी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. शुक्रवार दि. 10 रोजी रसायनी पाताळगंगा परिसरातील आठ जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. तसेच कंपनीलगतच्या एमआयडीसी परिसरात विविध जातींच्या 3100 वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षांचे संवर्धन रिलायन्स इंडस्ट्रीज पाताळगंगाकडून करण्यात येणार आहे.