मुंबई : भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्या बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवरील टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीच्या परंपरेबाबत बोलताना राऊत यांनी आधी इतिहास तपासावा, असा टोला त्यांनी लगावला.

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर बीडमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार देत निवडणूक बिनविरोध होऊ दिली नव्हती, याची आठवण बन यांनी करून दिली.
त्याच वेळी, आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर भाजपाने उमेदवार न देत सौजन्य दाखवले होते, असेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे महाराष्ट्राच्या परंपरा आणि प्रथा पायदळी तुडवण्याचे काम भाजपाने नव्हे, तर काँग्रेसनेच केल्याचा आरोप त्यांनी केला. संजय राऊत यांनी काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसल्यानंतर अशा प्रकारचे भाषण करणे दांभिकपणाचे असल्याची टीकाही त्यांनी केली.