खेड : – तालुक्याचे मुख्य वाहतूक केंद्र असलेले खेड बसस्थानक सध्या मद्यपि व माथेफिरूंच्या वाढत्या वावरामुळे चर्चेत आले आहे. दिवसेंदिवस येथे गैरप्रकारांचे प्रमाण वाढत असून प्रवासी, विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिक, भीतीच्या छायेत प्रवास करत असल्याचे चित्र आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, संध्याकाळनंतर बसस्थानक परिसरात मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्यांची संख्या वाढते. अनेकदा हे व्यक्ती प्रवाशांना त्रास देणे, शिवीगाळ करणे, तसेच भांडणे करणे यांसारखे प्रकार करताना दिसतात. त्यामुळे बसस्थानकाचा परिसर असुरक्षित बनला आहे.प्रवाशांनी सांगितले की, दिवसा बसची वाट पाहताना मोठ्या प्रमाणात अस्वस्थता जाणवते. काही वेळा मद्यधुंद अवस्थेत असलेले लोक गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करतात, यांच्या उपद्रवामुळे अनेकांनी या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याची मागणी केली आहे. दरम्यान, बसस्थानक परिसरात पोलीस चौकी असून देखील याठिकाणी दिवसभरात कोणी पोलीस नसतात. त्यामुळे मद्यपि आणि माथेफिरुना कोणताही धाक राहिलेला नाही. स्थानिक व्यापाऱ्यांनाही या परिस्थितीचा फटका बसत आहे.