चिपळूण (विशेष प्रतिनिधी): येथील भोगाळे मध्यवर्ती बस स्थानकातून तिवरे गावी निघालेल्या महिलेचे १४.६१ लाख रुपये किमतीचे ११ तोळे सोन्याचे दागिने चोरून पसार झालेल्या मंगल उर्फ शोभा अंकुश साठे (६० रा खंडाळा, जि. सातारा ) या संशयित आरोपी महिलेला चिपळूण पोलिसांनी यशस्वी तपास करून खंडाळ्यातून चोरलेल्या सर्व मुद्देमालासहीत ताब्यात घेण्यात यश मिळवले.

चिपळूणचे लोकप्रिय आणि यशस्वी पोलीस निरीक्षक श्री फुलचंद मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथकाने या गुन्ह्याचा यशस्वी तपास केला. चिपळूण पोलीस ठाण्यात ११एप्रिल २०२६ रोजी वैष्णवी विश्वनाथ शिंदे (४७.रा कावीळतळी चिपळूण) या महिलेने दागिने चोरीला गेल्याची रीतसर तक्रार दाखल केली. आपल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, ११ एप्रिल रोजी दुपारी ३:२० वाजण्याच्या सुमारास तिवरे गावाकडे जाणाऱ्या बस मध्ये शिरत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात इसमाने आपल्या खांद्याला अडकवलेल्या पर्स मधील विविध प्रकारचे ११ तोळे दागिने चोरून पोबारा केला. आपण आपल्या मुलीसह तिवरे गावी नातेवाईकांच्या लग्नासाठी जात होतो. त्यावेळी हा प्रकार घडला.
चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये गंथन, सोनसाखळ्या, हार, कर्णफुले, बांगड्या असे ११ तोळ्याचे दागिने चोरीला गेले आहेत. या तक्रारीवरून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक श्री मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय आघाव व डीबी पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला.

प्रारंभी बस स्थानकातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, तेव्हा ऑटो रिक्षात बसून एक महिला संशयास्पद पद्धतीने पसार झाली असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी त्या रिक्षा चालकाचा शोध घेतला. तपासामध्ये त्या रिक्षा चालकाने एका महिलेला आपण फरशी तिथ्यावर सोडले असून माझ्याच मोबाईलने तिने कॉल केला असल्याची माहिती पोलिसांना दिली. तेव्हा त्या कॉलवर पोलिसांनी तपास सुरू केला आणि हा कॉल खंडाळा तालुक्यातील भाटघर येथील एका इसमाला करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर डीबी पथक थेट खंडाळ्यात पोहोचले. संशयित महिलेने ज्या व्यक्तीला कॉल केला होता तो साताऱ्यातील असून बदली ड्रायव्हरचे काम करतो.
त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्याने पोलिसांना संबंधित संशयित महिलेचे घर दाखवले तेव्हा पोलिसांनी पंचांच्या समक्ष घराची झडती घेतली असता घरामध्ये चोरीचे दागिने आढळून आले तसेच संबंधित महिलेने चोरीची कबुली दिली असून फिर्यादी महिलेने आपले दागिने देखील ओळखले आहेत. गुन्ह्यातील संशयित आरोपी महिलेला पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेऊन चिपळूणला आणले. अवघ्या चार दिवसात चोरीचा छडा लावल्यामुळे पोलिसांवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.