चिपळूण – चिपळूण ते पुणे मार्गावरील एस. टी. वाहतूक माणगाव ताम्हिणी घाट मार्गे व कोल्हापूर, बेळगाव मार्गावरील वाहतूक साखरपा आंबा घाट मार्गे सोडावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नित्यानंद भागवत यांनी केली आहे.
पाटण शहरातील रस्त्याच्या कामामुळे कराड, उंब्रज मार्गे जाणारी एस. टी. वाहतूक पर्यायी रस्त्याने जवळ जवळ १० ते १२ किमी वळसा घालून सुरु आहे. चिपळूण येथून सातारा, बीड, नांदेड, अक्कलकोट, परळी वैजनाथ, धाराशिव, सांगली, मिरज कडे जाणाऱ्या वाहतुकीला या वळसा मारुन वाहतूक करण्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही. चिपळूण मधून पुणे, शिर्डी व छत्रपती संभाजीनगर होणाऱ्या सर्व वाहतुकीला माणगाव ताम्हिणी घाट मार्गे, तसेच कोल्हापूर व बेळगाव होणाऱ्या सर्व वाहतुकीला साखरपा आंबा घाट मार्गे अंतर कमी असणारा चांगला पर्याय उपलब्ध आहे.
सध्या गर्दीचा हंगाम सुरु असल्याने एस. टी. प्रशासनाने १५% भाडेवाढ केली असल्याने, मुळातच प्रवासभाड्यात वाढ झालेली असताना, पाटण शहरातील रस्त्याच्या कामामुळे वळसा मारुन होत असलेल्या वाहतुकीमुळे त्यात आणखी भर पडत आहे. पुण्याच्या साध्या गाडीच्या (लालपरीच्या) प्रवासी भाड्यात १५% भाडेवाढ व अधिकचे अंतर धरुन ६५ रुपयांची वाढ होत आहे.
चिपळूण ते पुणे मार्गावरील वाहतूक माणगाव ताम्हिणी घाट मार्गे व चिपळूण ते कोल्हापूर / बेळगाव वाहतूक साखरपा आंबा घाट मार्गे सुरु केल्यास प्रवासी वर्गाचा वेळ व पैसा दोन्ही वाचेल, अधिक एस.टी.च्या इंधनात देखील बचत होईल.
एस.टी. प्रशासनाने चिपळूण ते पुणे व कोल्हापूर मार्गावरील प्रवासी वर्गाची जादा अंतर, पैसा व वेळ यातून सुटका करावी. या विषयात एस.टी. प्रशासनाने व चिपळूण मधील लोकप्रतिनिधी यांनी प्राधान्याने लक्ष घालावे, अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते नित्यानंद भागवत यांनी केली आहे.
चिपळूण ते पुणे मार्गावरील एस. टी. वाहतूक माणगाव ताम्हिणी घाट मार्गे सोडावी – नित्यानंद भागवत
