खेड : – मागील काही वर्षे कोकण विभागात धनगर समाजोन्नती मंडळाचे काम फारच कमी प्रमाणात होत होते, त्यामुळे कोकण विभागातील जनतेतून नाराजी प्रकट होत होती.पुन्हा मंडळाला संजीवनी देण्यासाठी मंडळाने रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी जेष्ठ समाजसेवक रामचंद्र आखाडे यांच्याकडे सोपविली आहे.

कोकण विभागात धनगर समाजाच्या विकासासाठी स्थापन झालेले,” कोकण धनगर समाजोन्नती मंडळ, मुंबई” हे पहिले सामाजिक मंडळ असुन या मंडळाच्या माध्यमातून कोकण विभागातील दुर्लक्षित असलेल्या धनगर समाजाला विकासाची दिशा दाखवण्याचे काम या मंडळाने केले आहे.या मंडळाने कोकण विभागात अनेक समाजनेते/कार्यकर्ते घडवले आहेत व ते आज सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत. मागील अनेक वर्षांपासून रामचंद्र आखाडे रत्नागिरी जिल्ह्यात सामाजिक काम करत आहेत.त्यांनी समाजाच्या अनेक विषयांना वाचा फोडून धनगर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत.
कोकण धनगर समाजोन्नती मंडळ, मुंबई या मंडळाने आपली रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी नेमणूक केल्याबद्दल रामचंद्र आखाडे यांनी मंडळाचे आभार मानले असून रत्नागिरी जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांच्या विकासासाठी कोकण धनगर समाजोन्नती मंडळ, मुंबई या मंडळाच्या बॅनरखाली काम करून मंडळाचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.