चिपळूण : सह्याद्रीच्या वाटा आणि प्रत्येक प्राणी-पक्षी ज्यांना ओळखीचे होते असे वनप्रेमी कै. निलेश बापट यांचे नाव वनविभाग रत्नागिरीच्या चिपळूण कार्यालयाबाहेर त्यांच्याच संकल्पनेतून उभारलेल्या छायाचित्र दालनाला देण्यात आले आहे. सर्व निसर्गप्रेमींची अनेक दिवसांची इच्छा पूर्ण झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
छायाचित्र दालनाला कै.निलेश बापट यांचे नाव लागावे यासाठी चिपळूणातील निसर्गप्रेमींनी आमदार शेखर निकम व पालकमंत्री उदयज सामंत यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. ‘ग्लोबल चिपळूण’च्या माध्यमातून रत्नागिरी, देवरुख व चिपळूण येथील विविध सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरण संस्थांची भेट घेऊन मागणीपत्र तयार करण्यात आले.
या कामात सर्वात मोठा पाठपुरावा आमदार शेखर निकम यांचे स्वीय सहाय्यक अमित सुर्वे यांनी केला. पत्र देणे, संबंधित सचिवांच्या टेबलवर नेणे, त्यावर रिमार्क मारून घेणे, नागपूर-कोल्हापूर-रत्नागिरी तसेच रत्नागिरी-कोल्हापूर-नागपूर ते मंत्रालय असा सर्व विभागांत त्यांनी स्वतःचे काम असल्याप्रमाणे पाठपुरावा केला. या कामासाठी आमदार शेखर निकम यांनी कार्यकर्त्यांना तीन वेळा मंत्रालयात नेले.
पहिल्या वनमंत्री भेटीवेळी रामशेठ रेडीज यांच्यासोबत विलास महाडिक, धीरज वाटेकर, विश्वास पाटील, अजित जोशी उपस्थित होते. एका भेटीवेळी ओंकार बापट यांच्यासह इतर मान्यवर होते. शेखर सरांनी या कामासाठी स्वतःहून सर्वांना बोलावून घेतले.
अखेर मंगळवार दि. २१ रोजी आमदार शेखर निकम यांनी मंत्रालयात बोलावले. त्यावेळी शाहनवाज शाह व रामशेठ रेडीज मंत्रालयात गेले. सचिवांच्या अंतिम सह्या झाल्यानंतर वनमंत्री महोदयांनी आदेश दिले व सचिवांनी संबंधित विभागाला पत्र दिले. त्यामुळे छायाचित्र दालनाला कै. निलेश बापट यांचे नाव देण्याचा मार्ग मोकळा झाला. अशी माहिती श्री शहानवाज शहा व श्रीराम रेडीज यांनी दैनिक सागरला दिली.