पोलादपूर (शैलेश पालकर) : तालुक्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघात सातत्याने होत आहेत. कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्ग सुरू झाल्याने वाहतुक सुरळीत झाली असूनही जुन्या कशेडी घाटात खचलेल्या ‘डेंजरझोन’मध्ये बुधवार, दि. 29 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री 11 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास महामार्गावरील भोगावजवळ खेड बोरीवली एसटी बस आणि काँक्रीट मिक्सर वाहनाची टक्कर होऊन झालेल्या बसमधील 9 प्रवासी व काँक्रीट मिक्सर वाहनाचा चालक असे 10 जण किरकोळ जखमी झाले. जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

पोलादपूर पोलीस ठाण्याला अपघाताची माहिती मिळताच ठाण्यामधील म्पोलीस कर्मचारी, कशेडी पोलीस, पोलादपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सर्व जखमींना पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये उपचारासाठी हलविण्यात आले. काँक्रीट मिक्सर चालक निखीलकुमार राजू पासवान (वय 23) यांनी पोलादपूर पोलास ठाण्यात अपघाताची खबर दिली. पोलादपूर पोलीस ठाण्यात अपघात गुन्हा 082026 नुसार दाखल करण्यात आला असून अधिक तपास पो. हवालदार बामणे हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.