चिपळूण : शहर आणि ग्रामीण भागात फोफावलेले अवैध भंगार व्यवसाय केवळ पर्यावरणासाठीच नव्हे, तर नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि जीवितासाठीही धोकादायक ठरत आहेत. मात्र, सर्वेक्षणानुसार ‘अवैध’ ठरूनही या व्यवसायांवर कारवाई करण्याची प्रशासकीय अधिकाऱ्यांची ‘इच्छाशक्ती’ शून्य आहे. या गंभीर उदासीनतेचा निषेध करण्यासाठी आज महाराष्ट्र दिनी ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मानवंदना देऊन साखळी उपोषण करण्यात आले.
गेल्या ४ महिन्यांपासून जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही केवळ कागदी घोडे नाचवले जात आहेत. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या समितीने स्पष्ट केले आहे की, यापुढे केवळ निवेदने न देता, कायदेशीर मार्गाने आणि अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल.
आजच्या साखळी उपोषणाचे नियोजन समितीचे सर्वश्री अनुराग उतेकर, राजेश ओतारी, अजिंक्य ओतारी, आदित्य जोशी, सभापती निहार कोवळे, हेमंत चाळके, विलास इंगवले, प्रशांत उतेकर, आशिष आठवले व इतर कार्यकर्त्यांनी केले होते.
