चिपळूण : मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा आणि मध्यभागी झाडे लावण्याच्या मागणीसाठी चिपळूणमध्ये आज शुक्रवारी महामार्ग विभागाच्या कार्यालयासमोर खड्डा खोदून पर्यावरणप्रेमी नागरिक श्री शहानवाज शहा व वृक्ष लागवड हक्क समितीचे कार्यकर्ते यांनी भू- समाधी आमरण उपोषण आंदोलन छेडले होते. त्यामुळे एकच खळबळ माजली.

आमदार शेखर निकम यांनी याप्रकरणी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन महामार्ग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधला, त्यावेळी १५ मे पर्यंत महामार्गाच्या दुतर्फा खड्डे खोदले जातील आणि १५ जुलैपर्यंत झाडे लावण्यात येतील असे लेखी आश्वासन मुख्य अभियंता श्री संतोष शेलार यांनी दिल्यानंतर उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आले.

आज सकाळी श्री शहानवाज शहा हे स्वतः भू समाधी आमरण उपोषणाला खड्ड्यात जाऊन बसले तर रामशेठ रेडीज, किशोरभाई रेडीज, उदय ओतारी, बाळा कदम, दत्ता कदम, दिगंबर सुर्वे, भरत लब्धे आदी वृक्ष लागवड समितीचे कार्यकर्तेही उपोषणात सहभागी झाले. या आंदोलनाला चिपळूणमध्ये विविध संस्था, सामाजिक संघटना आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.त्यामुळे या आंदोलनाची व्याप्ती वाढली.

आमदार निकम यांचे यशस्वी प्रयत्न

आंदोलन सुरू झाल्यानंतर आमदार शेखर निकम उपोषणस्थळी दाखल झाले. त्यांनी शहानवाज शहा, रामशेठ रेडीज, किशोरभाई रेडीज आदींशी चर्चा केली. त्यानंतर कोकण भवन मधील मुख्य अभियंता संतोष शेलार यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि आंदोलनकर्त्यांना न्याय देण्याची सूचना केली. त्यानुसार मुख्य अभियंता श्री शेलार यांनी वृक्ष लागवड हक्क समितीच्या मागण्यांबाबत लेखी पत्र कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांच्या माध्यमातून उपोषणकर्त्यांपर्यंत पोहोचविले. त्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. मुंबई-गोवा महामार्गाच्या दुतर्फा आणि मध्यभागी झाडे लावण्यात यावीत यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले होते.