लांजा : विकासकामे होताना नागरिकांनी थोडा संयम ठेवून प्रशासनाला सहकार्य केल्यास कामे जलदगतीने होतील. परंतु, प्रशासकीय अधिकाऱ्यांनीदेखील जनतेला विश्वासात घेऊन काम करावे. स्वतःच्या मर्जीनुसार कामे करू नयेत, अशी सक्त सूचना आमदार किरण सामंत यांनी लांजा येथे झालेल्या जनता दरबारात दिली.

लांजा तालुक्यातील जनतेच्या प्रशासकीय अडचणी, आरोग्यविषयक तक्रारी, विकासकामे, शासकीय योजनांचा लाभ घेण्यास येणारे अडथळे तसेच इतर कोणत्याही वैयक्तिक किंवा सामाजिक समस्येवर मार्ग काढण्यासाठी बुधवार, १३ मे रोजी दुपारी ३ वाजता लांजा शहरातील अजिंक्य मंगल कार्यालय येथे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, जनता दरबारावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी मनुज जिंदल, आमदार किरण सामंत, प्रांताधिकारी विश्वजीत गाताडे, तहसीलदार प्रियांका ढोले, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास चाळके, लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, लांजा नगराध्यक्षा सावली कुरूप, उपनगराध्यक्ष मिलिंद लांजेकर, पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर, उपसभापती आदेश आंबोळकर यांच्यासह विविध विभागांचे शासकीय अधिकारी व तालुक्यातील जनता उपस्थित होती.