मुंबई : देशात पेट्रोल व डिझेलची दरवाढ झाल्याने त्याचा मोठा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. इंधन महाग झाल्याने खाद्यतेल, दुधासह सर्वच वस्तुंची महागाई होणार आहे. महागाईची ही झळ इराण युद्धामुळे झाल्याचे चित्र निर्माण करत जनतेने काटकसर व त्याग करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले परंतु ही महागाई केवळ युद्धामुळे नाही तर मोदी सरकारच्या १२ वर्षांतील चुकीच्या आर्थिक व परराष्ट्र धोरणांचा परिपाक आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.
टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना अतुल लोंढे पुढे म्हणाले की, मोदी सरकार आल्यापासून १४४ महिन्यातील १४० महिने आपले आयात-निर्यात निगेटिव्ह आहे. चीनबरोबरचा व्यापार ११२ बिलियन डॉलर निगेटिव्ह आहे, भारत चीनकडून आयात जास्त करतो आणि निर्यात कमी करतो. अमेरिकेबरोबरचा व्यापार सकारात्मक होता पण एपस्टिन फाईल्समुळे व उद्योगपती अदानींना जी सुट मिळत आहे, जो व्यापार करार केला त्यामुळे भारतातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.
रशिया व इराण कडून भारताला रुपयामध्ये तेल मिळत होते पण अमेरिकेच्या दबावामुळे भारताला आता हे तेल घेता येत नाही. रशियाकडून जे स्वस्तात तेल मिळत होते त्याचा फायदा मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी व नायरा कंपनीला झाला, सर्वसामान्य जनतेला झाला नाही. युपीए सरकारच्या काळात ३ रुपये एक्साईज ड्युटी होती ती वाढवत ३३ रुपयापर्यंत केली यातून लाखो करोडो रुपयांचा नफा कमावला. जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती कमी होत्या त्यावेळी पेट्रोल डिझेलचे दर कमी केले नाहीत. इंधन उत्पादन वाढवून आयात कमी करण्याचा निर्णय २०१५ साली जाहीर केला होता पण तोही फसला असून आपली आयात ८९ टक्क्यांपर्यंत वाढलेली आहे. पेट्रोल १५ रुपये लिटर करू, असे नितीन गडकरी म्हणाले होते त्याचे काय झाले, असा सवालही लोंढे यांनी विचारला आहे. वाढलेली आयात, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती व रुपयाची घसरण, याचे परिणाम सामान्य माणसाला भोगावे लागणार आहेत, असेही लोंढे म्हणाले.
