पनवेलः ‘स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समिती’ची महत्त्वपूर्ण बैठक रविवारी (दिनांक १७ मे) नवीन पनवेल येथील बांठीया शाळेमध्ये पार पडली. परप्रांतीयांच्या वाढत्या लोंढ्यांमुळे महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक रचनेवर गंभीर परिणाम होत असून, ‘परप्रांतीय मुक्त महाराष्ट्र’ घडवण्यासाठी राज्यघटनेच्या “आर्टिकल १९” मध्ये दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत या बैठकीत सर्व उपस्थितांनी व्यक्त केले.
बैठकीदरम्यान “आर्टिकल १९” (स्वातंत्र्याचा अधिकार) मध्ये दुरुस्ती करण्याची गरज का आहे, तसेच महाराष्ट्रासाठी “राज्याचा स्वतंत्र नागरिकत्व कायदा” का असावा, याविषयी सविस्तर कायदेशीर व सामाजिक पैलूंवर माहिती देण्यात आली. स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीच्या माध्यमातून स्थानिकांचा रोजगार, मराठी भाषेचे संवर्धन आणि मराठी शाळांचे प्रश्न यांवर सातत्याने काम सुरू असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

संघटनेचे विचार आणि ध्येय धोरणे पाहून या बैठकीत अनेक नवीन सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. यामध्ये प्रामुख्याने अॅड. लिना महाडिक, श्रीमती सीमा तांबोळी, योगेश तांबोळी, प्रभाकर पंडित, पुंडलिक कारागीर आणि अनिल पाटकर यांचा समावेश होता.
बैठकीच्या शेवटी, उपस्थित सर्व सदस्यांनी आपापल्या विभागातून संघटनेच्या कार्यात सक्रियपणे जोडले जावे आणि हा विचार लोकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले.